संतोष बामणे ल्ल जयसिंगपूर महाडच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व ब्रिटिकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुलावरील डांबरीकरण खचल्यामुळे अनेक पुलांना धोका निर्माण झाला आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव-अंकली दरम्यान नवीन पुलावर रस्त्याची दुरवस्था झाल्याने कोणतेही वाहन गेल्यास पुलास मोठा हादरा जाणवत असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर या पुलावरील मार्ग दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडण्यासाठी कृष्णा नदीवर १८७८ मध्ये संस्थानिक व ब्रिटिश काळात दळणवळणसाठी प्रमुख मार्ग बांधण्यात आला. आजही तो या दळणवळणाचा साक्षीदार असुन आपली सेवा बजावत आहे. दरम्यान, या मार्गावर वाहतुकीची संख्या वाढल्याने १९९८ साली लोकप्रतिनिधी रेटा लावून या मार्गावर ब्रिटिशकालीन पुलाला पर्यायी पूल १९९८ साली मंजूर करून घेतला त्यानंतर प्रत्यक्षात २००० साली हा नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी येथील ब्रिटिशकालीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र येथील नवीन पुलाचे डांबरीकरण करण्यात आले नाही. सध्या नवीन पुलावरील रस्ता खराब झाला आहे. तसेच पुलाच्या जोड पिलरच्या लगतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने पुलावरून वाहन गेल्यास पुलाला हादरा बसत आहे. दरम्यान, जुन्या पुलाबरोबर याही पुलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण केले असते तर या पुलाची सुरक्षा वाढली असती. कोल्हापूर-सांगली महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. तसेच कृष्णा नदीवर सांगली-कोल्हापूर महामार्गावर दोन समांतर पूल आहेत. त्यातील एक पूल ब्रिटिशकालीन असल्याने नव्या पुलावरूनच वाहतूक अवलंबून आहे. सध्या दोन्ही पुलांवरून वाहतुक सुरू असली तरी नव्या पुलाची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही पूल सुरक्षित राहण्यासाठी पुलावरील डांबरीकरणाचे काम करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या पुलावरून सांगली-मिरजवरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. या पुलावरील ठिकठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही वेळा किरकोळ अपघातही घडत आहेत. शिरोळ तालुक्यातील अकरा पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये उदगाव-अंकली नवा व जुना पूल, नृसिंहवाडी-कुरुंदवाड यादव पूल, मिरज-अर्जुनवाड पूल, चिंचवाड पूल, नृसिंहवाडी-औरवाड-नवीन व जुना पूल, कुरूंदवाड-शिरढोण पूल, शिरटी-हसूर नाला, कुरुंदवाड-अकिवाट कुंभार नाला, सैनिक टाकळी-खिद्रापूर पूल या पुलांचा समावेश आहे. यामध्ये वालचंद कॉलेज सांगली यांच्याकडून या पुलाचे आॅडिट होणार असल्याचे समजते. अकरा पुलांचे आॅडिट सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे कामकाज बीओटी कंपनीकडून सुरू आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद आहे. तसेच उदगाव-अंकली या मर्गावरील जुन्या पुलावरील रस्त्याचे काम कंपनीने पूर्ण केले आहे; पण नवीन पुलावरील डांबरीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन घेऊ. - वसंतराव वडेर, शाखा अभिंयता, जयसिंगपूर.
उदगावच्या नव्या पुलाला खड्ड्यांमुळे धोका
By admin | Published: October 31, 2016 12:00 AM