आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : गेले चार-पाच दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदम गारठला आहे. मालाची आवक व उठाव कमी झाला असून बाजारपेठेत शांतता आहे. केंद्र सरकारने जी. एस. टी. लागू केला असला तरी अद्याप त्याबाबतची स्पष्टता व परिणामांबाबत धान्यबाजारात संभ्रमावस्था पसरली आहे. त्याचा परिणाम उलाढालीवरही झाला असून भाजीपाला दरात मात्र चढउतार कायम राहिला आहे. जुलै महिन्यात फळांची आवक व उठाव कमीच असतो. त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदमच गांगरला आहे. डाळिंब वगळता अन्य फळांची आवक मंदावली असून मागणी नसल्याने दरावर परिणाम दिसत नाही. महिनाभर ही मंदी राहणार असून, त्यानंतर सीताफळ व नवीन सफरचंदांची आवक सुरू होणार आहे. सध्या आंध्रप्रदेशाहून मोसंबींची आवक सुरू आहे. पांढऱ्या पेशीसाठी पोषक असणारे ‘किव्ही’, तर पित्तनाशक ‘पल्म’ ही दोन फळे सध्या बाजारात आली आहेत. ‘किव्ही’ घाऊक बाजारात ११०० रुपये प्रतिबॉक्स असून, ‘पल्म’च्या बॉक्सची किंमत ३५० रुपये आहे. धान्यबाजार तसा पावसाळ्यात स्थिर राहतो; पण ‘जी. एस. टी.’मुळे व्यापारी गोंधळात पडले आहेत. आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत साखर दीड रुपया, तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची घसरण झाली आहे. सरकी तेल किरकोळ बाजारात ७० रुपयांवर आहे. आषाढी एकादशी मंगळवारी असल्याने शाबूदाणा व ‘वरी’ची मागणी थोडी वाढली आहे. मागणी वाढली तरी दरात फारसा फरक दिसत नसून किरकोळ बाजारात शाबू व वरी ७० रुपये किलोचा दर राहिला आहे. सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. स्थानिक भाजीपालाही कमी झाल्याने काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्या घसरल्या आहेत. वांगी, टोमॅटो, ओली मिरची, दोडक्याच्या दरांत वाढ झाली आहे. कोबी, ढबू मिरची, गवार, भेंडी, वरण्याच्या दरांत मात्र घसरण झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या पेंढीचे दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सरासरी १४ रुपये पेंढीचा दर आहे.
तोतापुरीची आवक मंदावली
पावसाळ्यात साधारणत: जूनपासून पुढे दोन महिने तोतापुरी आंब्यांची आवक चांगली असते; पण यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच आवक मंदावल्याने बाजारात ‘तोतापुरी’ फारसा दिसत नाही.
कांदा-बटाटा स्थिर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, बटाट्यांची आवक निम्म्याने खाली आली आहे. तरीही दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा ९, बटाटा ११, तर लसूण ५० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.