कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारी, चॅनेल, छोटे, मोठे नाले साफ करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. धोकादायक इमारती उतरवून घेण्यावर जोर दिला; परंतु शहरातील प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करण्याकडे दुर्लक्ष केले. यंदा एप्रिल व मे महिन्यांत महानगरपालिका प्रशासनाने एकाही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही. शहरात ११८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्यामुळे पॅचवर्क केलेले रस्ते खराब होतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही; परंतु त्याचे परिणाम मात्र आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत.आयआरबी कंपनीने केलेले ४९ किलोमीटरचे रस्ते तसेच महानगरपालिका प्रशासनाने केलेले जोडरस्ते वगळता अन्य सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना ते संभाजीनगर हा शहरातील प्रमुख रस्ता अतिशय खराब झाला आहे.
शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश ते रंकाळा चौपाटी हाही रस्ता पूर्ण उखडलेला आहे. गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनधारकांना कसरतच करावी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेशन रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, लुगडी ओळ, इब्राहिम खाटीक चौक, महाराणा प्रताप चौक, सावित्रीबाई फुले चौक, आदी परिसरातील रस्त्यांची अवस्था तर फारच बिकट झालेली आहे. यापूर्वी इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती.ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, अनेक ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. शहराच्या अनेक भागांत त्यामुळे वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली. चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून आली. या खड्डेमय रस्त्यातून दुचाकीस्वार व तीनचाकी रिक्षाचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.