कागल (जि.कोल्हापूर) : अॅड. प्रकाश आंबेडकर यांना खरोखरच आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात लढायचे आहे काय? भाजप-शिवसेना युतीचा पराभव व्हावा अशी त्यांची खरोखरच इच्छा आहे काय? असा त्यांचाविषयी संशय आता जनतेच्या मनात येत आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी कागल येथील पत्रकारपरिषदेत केले.बहुजन वंचित आघाडी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीत यावी, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागा मागितल्यावर वरिष्ठ नेत्यांनी चार जागा देण्याची तयारी दर्शविली, पण यावर कोणतीच चर्चा न करता त्यांनी १९ जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले असेही मुंडेनी नमूद केले.अॅड. आंबेडकर यांच्या ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना नेमके करायचे आहे तरी काय ? त्यांची खरी लढाई कोणाबरोबर आहे. याबद्दल निश्चित धोरण दिसत नाही. भाजप-सेना युती होणारच होती. महाराष्ट्राच्या जनतेला पाच वर्षे वेड्यात काढण्याचे काम त्यांनी केले. सत्तेत राहून जनतेची दिशाभूल करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे भाजप -सेनेच्या पराभवासाठी आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस -राष्ट्रवादीशी आघाडी करावी.खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांचा योग्य सन्मान आमचे वरिष्ठ नेते करतील. त्यामुळे ते काँग्रेस- राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या महाआघाडीसोबतच राहतील, असा मला विश्वास आहे.राज ठाकरेंची मदत होऊ शकते..मुंडे म्हणाले, मनसेच्या महाआडीतील समावेशाबाबत आमचे नेते निर्णय घेतील. पक्षाचे तसे काही ठरलेले नाही, पण अजित पवार यांची याबाबत भूमिका सकारात्मक आहे. आज राज ठाकरे भाजपच्या चुकीच्या धोरणांवर तुटून पडत आहेत. महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा परिस्थितीत त्यांची महाआघाडीला चांगली मदत होऊ शकते.मोदींंकडून देशभक्तीचे राजकारण...धनंजय मुंडे म्हणाले, यापूर्वीही भारताने पाकिस्तानाविरुद्ध युद्धे लढली. कोणी त्याचे राजकारण केले नाही, पण पंतप्रधान मोदी हे अत्यंत खालच्या पातळीवर येऊन याविषयाचे राजकारण करीत आहेत. हे सगळे एकट्याने केले. सगळे श्रेय माझेच, अशा थाटात भाषणे देत आहेत.आपले ४९ सैनिक ठार झाले म्हणून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली, पण नेमके तेथे काय केले. हे अजून ते सांगू शकलेले नाहीत.पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात बुलडाण्यात दोन जवान शहीद झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला शासनाचा एकही मंत्री, पालकमंत्रीही हजर नव्हता.मोदींची सभा त्याचवेळी महाराष्ट्रात होती. ते राजकीय सभा, उद्घाटने करीत होते. ते देशभक्तीचे निव्वळ राजकारण करीत आहेत अशी टीकाही मुंडे यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल जनतेला संशय : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:19 PM