येळावी : सत्तेच्या अति लोभामुळे सध्याचे सरकार यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणावर घाला घालून संस्थाच नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागावर याचा विपरित परिणाम होऊन संपूर्ण अर्थकारण यामुळे ढासळणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी येळावी (ता. तासगाव) येथे केले. येथे जिल्हा परिषद व आमदार फंड व इतर विविध योजनांतून मंजूर झालेल्या विकास कामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री आ. जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, स्मिता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, पंचायत समितीच्या सभापती मेघा झांबरे, उपसभापती शिवाजी पाटील, हर्षला पाटील, हणमंतराव देसाई, अविनाश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विश्वासतात्या पाटील, राजाराम पाटील, सुनील पाटील, दिनकर पाटील, पितांबर पाटील, जगन्नाथ मस्के, शंकर पाटील व अमोल पाटील आदी उपस्थित होते.नाईक-निंबाळकर म्हणाले की, राज्यात सर्व भागात दुष्काळ सारखाच असून, येथील शेतकरी आत्महत्या न करता इतर व्यवसायांतून परिस्थितीवर मात करत आहेत. सुविधांचा अनुशेष गरजेचा नसून, विचारांचा अनुशेष गरजेचा आहे, परंतु विदर्भातील मंडळी घटनेचा आधार घेऊन अखंड महाराष्ट्रावर घाला घालण्याचे काम करीत आहेत. आ. जयंत पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार सत्तेवर आल्यापासून फक्त घोषणा देत आहे. यांची आता घोषणांची श्वेतपत्रिका काढणार असून, कायम पश्चिम महाराष्ट्राचा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आर. आर. पाटील यांनी पाठपुरावा केलेल्या योजनांचे उद्घाटन करण्यास येतात, याची खंत वाटते. वाढती बेरोजगारी, शेतमालांचे ढासळलेले दर,अपूर्ण पाणी योजना, मंदी, गुन्हेगारी अशा सर्व बाबींवरुन लक्ष विचलित करून फक्त भूलभुलय्या दाखवत आहे. नोटाबंदीचा फायद्यापेक्षा तोटाच होत असल्याचेही सांगितले. यावेळी विकास कामांच्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार सुमनताई पाटील, दिलीप पाटील, डी. के. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विलास माने, बापू माळी, प्रदीप माने, शांताराम गावडे, सर्जेराव सूर्यवंशी, सुरेश माने, नारायण सुर्वे, गणेश पाटील, मौला शिकलगार, राजेंद्र यादव, पा. सा. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)दिलीपतात्यांची टिप्पणीजिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी माझा वाटा मोठा होता, परंतु त्यानंतर दरवेळी मला डावलण्याचा प्रयत्न होताना दिसतो, याचा प्रत्यय याही ठिकाणी आल्यासारखे दिसते. या मिश्किल टिपणीला सर्वांनीच हसून दाद दिली.
सत्ताधारी भाजपमुळे ग्रामीण अर्थकारण ढासळले
By admin | Published: December 31, 2016 11:13 PM