कोल्हापूर : संक्रातीमुळे मागणी वाढल्याने वरणा, वांगे, गाजराचे दर अचानक वाढले आहेत. मटार व टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले आहेत. भोगीसाठी लागणारी बाजरी, तीळ, राळा, हरभरा डहाळे आणि सुगड्यांनी बाजार फुलला आहे.
येत्या बुधवारी भोगी, तर गुरुवारी संक्रांत आहे. घरोघरी मिक्स भाजी केली जात असल्याने भाज्यांची आवक वाढली आहे. सर्वाधिक मागणी वरणा, वांगे, गाजर, कांदेपातीला असते. हे ओळखून दरातही कृत्रिम वाढ झाली आहे. वांगी ४० ते ६० रुपये किलो आहेत. गाजरही ६० रुपये किलो आहेत. वरणा ८० ते १०० रुपये किलो आहे. कांदापात १० ते १५ रुपये पेंढी आहे. हरभरा डहाळे १० रुपयांना एक पेंढी आहे. राळे २० ते २५ रुपये पावशेर, बाजरी ३० रुपये किलो, बाजरी पीठ ५० रुपये किलो असा भाव सुरू आहे. तीळाचे दरही १५० रुपये किलोवर गेले आहेत. गुळ ५० रुपये किलो झाला आहे.
मटार व टोमॅटोची प्रचंड आवक झाली आहे. बाजार हिरवा आणि लाल रंगात न्हाऊन गेला आहे. मटार २० ते ३० रुपये किलो, तर टोमॅटो १० रुपये किलो झाला आहे. इतर भाज्यांमध्येही कारली, बिन्स, घेवडा, ढबू, कारली ३० रुपये किलो आहेत. कोबी, फ्लॉवरचे दर अजूनही सावरलेले नाहीत. ५ ते १० रुपये असा एका गड्ड्याचा दर आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अजूनही ५ ते १० रुपये पेंडी असाच दर आहे.
मातीबरोबरच डिझाईनच्याही सुगड्या बाजारात आल्या आहेत. ५ ते ६ रुपयांना एक असा त्यांचा दर आहे.
फळबाजारात अजूनही स्वस्ताईचे वारे कायम आहे. संत्री व माल्टा ३०, बोर २० असा दर आहे. सफरचंदचे दर शंभरच्या पुढेच आहेत.
फोटो:
१००९२०२०-कोल-बाजार सुगडी ०१, ०२
फोटो ओळ: संक्रातीमुळे बाजारात सुगडांना मागणी वाढली असून, जागोजागी अशी विक्री सुरु आहे.(छाया: नसीर अत्तार )
फोटो:
१००९२०२०-कोल-बाजार गाजर
फोटो ओळ: मागणी वाढल्याने गाजर व मटारची आवकही बाजारात जास्त दिसू लागली आहे. (छाया: नसीर अत्तार )
फोटो:
१००९२०२०-कोल-बाजार बाजरी
फोटो ओळ: संक्रातीमुळे बाजारात राळा, बाजरी आणि पिठाची गरज ओळखून असे विक्री स्टॅाल दिसत आहेत. (छाया: नसीर अत्तार )