कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी रविवारी कोल्हापुरात केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आग्रह धरला; पण त्यांनी हात जोडत ‘कोल्हापूरचे नाव घेतले तर आहे तीपण गुंतवणूक न करता पळून जातील,’ असे सांगितल्याने माझाही नाइलाज झाला, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.कोल्हापुरात आयोजित केलेल्या ‘व्हिजन २०२५’ मध्ये संभाजीराजे म्हणाले, या विषयावर आतापर्यंत कोणी बोलायचे धाडस केले नाही; पण मला बोलावेच लागेल. कोल्हापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शाहू महाराजांची भूमी म्हणून कोल्हापूरची ओळख होती; पण अलीकडे झालेल्या काही घटनांमुळे कोल्हापूरला लोक घाबरत आहेत. दक्षिण कोरियातील एस्सान ग्रुपमधील उद्योजकांचे शिष्टमंडळ मुंबईत आल्याचे समजले. त्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रासह गुजरात व आंध्रप्रदेशची निवड केली होती. एका शहरात तब्बल तीन हजार कोटीची गुंतवणूक ते करणार असल्याने मी लागलीच त्यांची भेट घेतली. रात्री साडेबारा वाजता शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे, तर कोल्हापूरची त्यासाठी निवड करावी, असा आग्रह मी धरला.मुख्यमंत्र्यांनी मला अॅँटिचेंबरमध्ये घेऊन हात जोडत ‘कोल्हापूरचे तेवढे नाव काढू नका. शिष्टमंडळाला फार फोर्सही करू नका; नाही तर आहे ती गुंतवणूकही परत जाईल. तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. एकट्या कोल्हापूरचा विचार करू नका. देशातील प्रत्येक शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करता,’ असे सांगितले. यावर माझाही नाइलाज झाला; पण एवढी मोठी गुंतवणूक येऊ न शकल्याचे शल्य मनात कायम राहिले. त्यामुळे कोल्हापूरची तयार झालेली प्रतिमा बदलण्याचे धोरण आता आपल्याला स्वीकारावे लागणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.गुंतवणूकदारांमध्ये आकसगेल्या काही वर्षांत कोल्हापुरात टोलसारखी मोठी आंदोलने झाली. आंदोलनामुळे गुंतवणूकदारांमध्ये कोल्हापूरविषयी आकस तयार झाला आहे. याचे प्रत्यंतर वारंवार येत आहे; पण उघडपणे कोणी बोलत नव्हते.मध्यंतरी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील आपल्यालाही असा अनुभव आल्याचा एके ठिकाणी ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर आता खासदार संभाजीराजे यांनी कोणी नाराज झाले तरी चालेल; पण वस्तुस्थिती मांडावीच लागेल, असे सांगून या विषयाला तोंड फोडले आहे.
कोल्हापूरच्या धास्तीमुळे तीन हजार कोटींचा प्रकल्प गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:33 AM