राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : मजुरीवाढीच्या प्रश्नी चर्चा सुरू असतानाच अचानकपणे काम बंद आंदोलन करायचे आणि उद्योजक-व्यावसायिकांची कोंडी करावयाची, असा फंडा वस्त्रनगरीत रुजू लागला आहे. मालगाड्यांमध्ये सूत व कापडाची भरणी-उतरणी करणाऱ्या माथाडी कामगार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने ही समस्या ऐरणीवर आली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर सूत-कापडाची वाहतूक ठप्प झाली असून, इचलकरंजी आता आंदोलनाचे शहर म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. कामगार व मालक-पुढाºयांमध्ये समन्वय नसल्याने मजुरीवाढीची आंदोलने चिघळत आहेत.इचलकरंजीच्या कामगार चळवळीचा इतिहास ५० वर्षांचा आहे. त्यावेळी तीन वर्षांतून एकच वेळ यंत्रमाग कामगारांच्या पगारवाढीसाठी आंदोलन होत असे; पण यंत्रमाग कामगार व कारखानदार यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन प्रश्नांची सोडवणूक करीत असत. यंत्रमाग कामगारांच्यापाठोपाठ वस्त्रोद्योगातील जॉबर, कांडीवाला, वहिफणी, माथाडी कामगार, घडीवाला, आदी घटकांचीही मजुरीवाढ आपोआप होऊन शहरातील यंत्रमाग कारखानदारीचा गाडा पूर्वपदावर येत असे.अलीकडील सात-आठ वर्षांत कामगार नेते आणि यंत्रमाग उद्योगातील पुढारी यांच्यातील समन्वय तुटला आहे. शहराचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींमध्येसुद्धा दुरावा निर्माण झाला असल्याने वहिफणी कामगार, कापडाच्या गाठी शिवणारे कामगार, माथाडी कामगार यासारख्या संख्येने कमी असलेल्या कामगारांच्या वेतनवाढीची आंदोलनेसुद्धा दीर्घकाळ चालू लागली आहेत. सन २०१३ मधील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत ४२ दिवस चाललेले यंत्रमाग कामगार वेतनवाढीचा लढा आणि त्यानंतर सन २०१५ मधील सायझिंग कामगारांचे ५२ दिवसांचे आंदोलन ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत.वाहतूकदार संस्थांकडे कार्यरत असलेले माथाडी कामगारांच्या मजुरीवाढीसाठी आॅगस्ट महिन्यापासून दोन-तीन बैठका झाल्या होत्या. अशा पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १) वाहतूकदार संघटना व कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींची सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बैठक सुरू असताना फिस्कटण्याची लक्षणे दिसताच त्याचदिवशी अचानकपणे माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू झाले. सहायक कामगार आयुक्तांनी मजुरीवाढीची चर्चा सुरू असल्याने काम बंद आंदोलन मागे घ्या, असे दोनवेळा आवाहन करूनही गेले सहा दिवस हे आंदोलन सुरू आहे.सूत व कापड याची वाहतूक बंद झाल्यामुळे शहरात सुताची टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम कापड उत्पादनावर झाला आहे. परपेठांमध्ये होणारी कापड वाहतूकसुद्धा ठप्प झाल्याने व्यापाºयांकडून आता कापड खरेदी थांबली असल्याने दसरा-दिवाळीच्या तोंडावर याचा परिणाम येथील वस्त्रोद्योगावर होऊ लागला आहे. कापडाची आवक-जावक मंदावली आहे.समन्वयातून सन्माननीय तोडगा झालाय दुर्मीळशहरामध्ये कामगारांचे नेते के. एल. मलाबादे, सूर्याजी साळुंखे, तसेच यंत्रमागधारकांचे नेते धनपाल टारे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आदींच्या कालावधीमध्ये अनेक आंदोलने झाली. त्या-त्या वेळी दिवसभर चर्चेच्या बैठका फिस्कटल्या. तरीसुद्धा रात्री या कामगार नेत्यांमध्ये परस्पर समन्वयाच्या बैठका होत असत. यातून कामगार व यंत्रमागधारक अशा दोघांनाही परवडेल, असा सन्माननीय तोडगा निघत असे. ज्यामुळे कामगार व यंत्रमागधारक यांच्यातील संबंध ताणले तरी तुटत नसत आणि या बैठकांतून निघणारा तोडगा राबविला जात असे. आता कामगारांची झालेली मजुरीवाढ यंत्रमागधारकांना देणे भाग पडते; पण कापड व्यापाºयांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांना मिळणाºया मजुरीमध्ये अस्थिरता आल्याने येथील यंत्रमाग उद्योग संपत चालला असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये आहे.
अचानक आंदोलनामुळे वस्त्रनगरी बदनाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:19 AM