कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे दाट धुके पसरल्याने वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला आहे. पहाटे ५.१५ च्या सुमारास महापारेषणच्या तळंदगे ४४० वीजउपकेंद्रातून मुडशिंगी २२० अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या २२० वाहिनीची आर्थिंग तार तुटल्याने मुडशिंगी अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.
परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात महावितरणचा वीजपुरवठा बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली होती. जवळपास चार तास वीजपुरवठा बंद राहिला. मात्र धुके कमी होताच यंत्रणा पूर्ववत होत असून बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी काम युध्दपातळीवर सुरू आहे.
अशाच प्रकारचा बिघाड आज पहाटेपासून विविध अतिउच्चदाब वीजउपकेंद्रांना येणाऱ्या वाहिन्यावर होत असल्याने अर्ध्या जिल्ह्यातील विद्युत पारेषण यंत्रणा ठप्प झाली होती. जसजसे धुके कमी होत आहे तसतशी पारेषण यंत्रणा पूर्ववत केली जात आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरूसकाळी ९ वाजेच्या सुमारास मुडशिंगी उपकेंद्राला कराडहून आलेल्या वाहिनीवरून सुरळीत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाहूमिल व विद्यापीठ उपकेंद्राला धुक्याचा फटका बसला होता. सकाळी ९ .३० च्या सुमारास दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाल्याने कोल्हापूर शहरातील वितरण पूर्ववत झाले. बिद्री, कोथळी, राधानगरी, गोकुळ शिरगाव, जयसिंगपूर व कुरूंदवाड अतिउच्चदाब केंद्रातून होणारा वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला आहे. गडहिंग्लज विभागातील वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी व इचलकरंजी येथील वीजपुरवठा बंद आहे. तो देखील थोड्याच वेळात पूर्ववत केला जात आहे.सांगलीला जादा फटका नाही...सांगली जिल्ह्यात मिरज भागातील ३३/११ वीज उपकेंद्राचा पुरवठा काहीअंशी पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला, तर २२० केव्ही मिरज ते विटा व कर्वे ते कडेगाव अतिउच्चदाब वीज वाहिन्यांवर बिघाड झाला असून पैकी कर्वे- कडेगाव वाहिनी कऱ्हाडहून सुरू केली आहे. बाकी सांगली जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे.