कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यांमुळे सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे किरणोत्सव झाला नाही. गेले दोन दिवस किरणांची तीव्रता चांगली असल्याने सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. ठरलेल्या तारखेनुसार किरणोत्सवाचा पहिला दिवस सोमवारी होता. यावेळी मात्र भाविकांची निराशा झाली.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव सोमवारपासून सुरू झाला. पूर्वी सात दिवस किरणोत्सव व्हायचा, हे गृहीतक मानून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शनिवारपासूनच किरणोत्सवाची पाहणी सुरू केली. या दोन्ही दिवशी किरणांची तीव्रता चांगली होती. धुकेही नव्हते त्यामुळे किरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. पाच दिवसांचा किरणोत्सव धरला तर सोमवारी या सोहळ्याचा पहिला दिवस होता; पण ढगाळ वातावरण आणि धुक्यांमुळे किरणांची तीव्रता अतिशय कमी होती. शिवाय मंदिरात आर्द्रतेचे प्रमाण अधिक होते. परिणामी, सूर्यकिरणे पितळी गाभाऱ्यापर्यंतदेखील पोहोचली नाहीत. गणपती मंदिराच्या चौकातूनच लुप्त झाली. नंतर पुन्हा सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी किरणे दिसू लागल्यानंतर मंदिरातील लाईट बंद करण्यात आले; पण त्यावेळी किरणांचे वलय कसेबसे गाभाऱ्यातील पायरीपर्यंत पोहोचले आणि लुप्त झाले.
ढगाळ वातावरण, धुक्यांमुळे अंबाबाईचा किरणोत्सव झालाच नाही, भाविकांची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:23 PM