काेल्हापूर : जुन्या पेन्शनबाबत बुधवारी रात्री राज्य सरकारबरोबर बोलणी फिस्कटल्यानंतर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपास्त्र उगारले. कोल्हापुरातील टाऊन येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या कर्मचारी शिक्षकांनी जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा असा नारा देत मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीत हिसका दाखवू असा सज्जड इशारा दिला. संपामुळे शासकीय कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट होता. कंत्राटी कामगार वगळता कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज ठप्प झाले होते. सन २००५ नंतर भरती झालेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनादेखील जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. २६ नोव्हेंबरला बेमुदत संपाचे पत्र दिले २ डिसेंबरला सहकुटूंब मोर्चा काढल्यानंतरही शासनाने कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याक़डे दुर्लक्ष केले मात्र संप होणार हे लक्षात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी कर्मचारी व शिक्षक संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यात आले मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा फिसकटली, त्यामुळे कर्मचारी व शिक्षकांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला.
जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: ..अन्यथा निवडणुकीत हिसका दाखवू, शासकीय कर्मचाऱ्यांचा सज्जड इशारा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 14, 2023 5:01 PM