Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज
By समीर देशपांडे | Published: March 28, 2024 06:07 PM2024-03-28T18:07:59+5:302024-03-28T18:08:39+5:30
भाजप, काँग्रेसच्या कार्यालयात लगबग : राष्ट्रवादीचे रंगकाम सुरू
समीर देशपांडे
कोल्हापूर : लोकसभा निवडणूक लागल्यामुळे पक्ष कार्यालयातील गजबज वाढली आहे. पक्षापेक्षा नेत्यांची कार्यालये आणि निवासस्थानांना महत्त्व येत चालल्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. तरीही येथील प्रमुख पक्ष कार्यालयांचा आढावा घेतला असता भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयात कामकाज जोरकसपणे सुरू असल्याचे दिसून आले.
भाजपने नागाळा पार्कामध्ये सुसज्ज असे जिल्हा कार्यालय बांधले आहे. सर्व सोयींनीयुक्त असलेल्या या कार्यालयात ग्रामीण आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था असून, खाली ४०० कार्यकर्त्यांची बैठक होईल, अशी सोय करण्यात आली आहे. आता मुख्य इमारतीमागे आणखी मोठा कायमस्वरूपी मंडप उभारण्यात येत असून, हजारभर कार्यकर्त्यांची सभा घेण्याची सोय केली जात आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता भाजप कार्यालयाला भेट दिली तेव्हा कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते, सहायक सिद्धार्थ तोरसकर हे पक्षाच्या बैठकांचे फोटो अपलोड करत होते. ग्रामीणचे विजय शिंदे हे शुक्रवारच्या बैठकीचे पदाधिकाऱ्यांना फोनवरून निरोप देत होते. प्रचाराचे साहित्याचे गठ्ठे एका बाजूला लावण्यात आले होते.
बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. कार्यालय तसे लहानच आहे. परंतु ते गोदामासारखे वाटत असल्याने आता रंगवण्यासाठी काढले आहे. त्यामुळे येथील सर्व साहित्य बाजूला काढून ठेवण्यात आले असून, रंगकाम वेगात सुरू आहे. येत्या आठवड्याभरात हे कार्यालय रंगवून सज्ज होणार आहे. स्टेशन रोडवरील काँग्रेसचे कार्यालय आता मोठे झाले असून, या ठिकाणीही लगबग सुरू होती. कार्यालय सचिव रवींद्र मोरे यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला होता. या ठिकाणी मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू होते.
धनंजय महाडिक चर्चेत
भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक हे लोकसभेच्या दृष्टीने चर्चा करण्यात मग्न होते. सत्यजित कदम आणि समीर शेठ यांच्यासोबत त्यांची नियोजनाची चर्चा सुरू होती. याचवेळी रुईकर कॉलनीतील मैदानाच्या विकासासाठीचे रेखाचित्र घेऊन त्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्यासोबत महाडिक यांची चर्चा सुरू होती.
सचिन चव्हाणही कामात
काँग्रेसच्या कार्यालयात शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे शहरातील मतदारांच्या याद्या फोडून ते वितरण करण्याच्या नियोजनात होते. त्यांच्यासमवेत सुजित देसाई, संपत चव्हाण पाटील, किशोर खानविलकर, अरुण कदम हे देखील कामात होते.
क्षीरसागरांचे निवासस्थान हेच कार्यालय
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे ‘शिवालय’ निवासस्थान हेच त्यांनी आपले आणि पर्यायाने शिवसेनेचे कार्यालय केले आहे. त्यांच्या पिताश्रींचे निधन झाल्यामुळे सध्या या ठिकाणी सांत्वनासाठी भेटणाऱ्यांची गर्दी अधिक आहे. शिवसेनेची आतापर्यंतची कार्यालये ही पक्षापेक्षा त्या-त्या नेत्यांची म्हणूनच ओळखली जातात.
अन्य कार्यालयांत गरजेनुसार हजेरी
टेंबे रोडवरील ‘शेकाप’चे कार्यालय, बिंदू चौकाजवळचे ‘भाकप’चे कार्यालय, शरद पवार गटाचे शिवाजी स्टेडियमच्या गाळ्यातील कार्यालय, ‘आप’चे उद्यमनगरातील कार्यालय यासारखी अन्य छोट्या पक्षांची कार्यालये रोज उघडून या ठिकाणी कार्यकर्ते बसत असून, गरजेनुसार या ठिकाणी बैठकांचेही आयोजन करण्यात येत आहे.