कोल्हापूरच्या हद्दवाढीस आम्ही तयार आहे, पण..; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:57 PM2024-08-12T15:57:38+5:302024-08-12T15:59:41+5:30
महापालिकेची लवकरच निवडणूक घेऊ
कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्यास आम्ही तयार आहे; पण काही लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. मतमतांतरे आहेत. त्यामुळे हा निर्णय होत नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरातील विविध प्रश्न आणि विकासकामासंबंधी महापालिका उदासीन असल्याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, महापालिकेची लवकरच निवडणूक घेऊ. नगरसेवक आल्यानंतर कामे होतील; पण सभागृह असताना याच शहराने तीन, तीन महिन्यांचे आणि चार महिन्यांचे महापौर पाहिले आहेत. हेही विसरून चालणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.
पंचगंगा प्रदूषणावर दोन दिवसांत बैठक
ते म्हणाले, पंचगंगा नदीला महापूर येऊ नये म्हणून अलमट्टी येथून पाण्याचा विसर्ग करण्यासंबंधी कर्नाटक शासनाकडून यंदा सहकार्य मिळाले. समन्वय चांगला राहिला. तिथे महाराष्ट्र जलसंपदा विभागाने एका अभियंत्यांची नियुक्तीही केली आहे. मी अनेक वर्षे जलसंपदा विभागाचा मंत्री होतो. मलाही चांगले माहीत आहे, की राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर वेगाने पाणी पुढे सरकत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या भराव्यामुळे नदीतील पाणी पुढे जात नाही, असे निदर्शनास आले आहे. या प्रश्नासंंबंधी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे. यातून काही मार्ग काढण्यासंबंधी चर्चा करणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर आहे. यावर मुख्य सचिवांसोबत येत्या दोन दिवसांत बैठक होईल.