समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपची अवस्था केविलवाणी होत होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी कोल्हापूर उत्तरला भाजपने नेटाने ताकद लावली. लक्षणीय मतेही घेतली परंतू तिथेही पराभवाच वाटणीला आला. आता धनंजय महाडिक थेट राज्यसभेचे खासदार झाल्याने त्यांची निवड जिल्ह्यातील भाजपसाठी ‘टॉनिक’ ठरणार आहे.
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यात भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला. जिल्हा परिषदेत सत्ता आली. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप ‘बॅकफुट’वर आहे. राज्यातील सत्ता गेल्याने अनेकांनी पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेशी जवळीक वाढवली. राज्यातील सत्तेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील सत्ता गेली. भाजपचा हक्काचा एकही आमदार जिल्ह्यात राहिला नाही. आमदार निवासासाठी कार्यकर्त्यांना पत्र मागायचे म्हटले तर कुणाकडे जायचे अशी अडचण झाली होती.एकीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनासोबत घेवून जिल्ह्यात आपल्याला हवे तसे राजकरण करत असताना केवळ आंदोलने करणे एवढेच भाजपच्या हाती उरले. ‘कोल्हापूर उत्तर’चे निमित्त साधून भाजप बिंदू चाैकातून बाहेर पडला आणि सत्यजित कदम यांच्या रूपाने त्यांनी सीमोल्लंघन केलं. कदम यांचा पराभव झाला असला तरी भाजपचा नेहमीच्या चौकडीतून बाहेर पडला आहे.
चंद्रकांत पाटील राज्याचा कारभार पहात असताना त्यांच्यानंतर जिल्ह्यात दोन नंबरचा भाजपचा नेता कोण असा प्रश्नच होता. ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर हे पराभवानंतर पक्षीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात फारसे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपसाठी पूर्ण वेळ देणारा स्वत:ची यंत्रणा, मनुष्यबळ असणाऱ्या नेत्याची भाजपलाही गरज होती. महाडिक परिवार हा कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये कार्यरत आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच धनंजय महाडिक यांना राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने याआधीच्या लोकसभेच्या पाच वर्षाचा अनुभव गाठीशी असलेले महाडिक राज्यसभेच्या खासदारकीच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांना बळ देवू शकतात.
ताकद देणारे पदमहाडिक यांची सहा वर्षांसाठी राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ देवू शकतात. अडचणीच्या काळात भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याने महाडिक यांनाही मिळालेल्या पदाचा पक्षासाठी सदुपयोग करून दाखवावा लागणार आहे. अनेक वर्षे असलेली ‘गोकुळ’ची सत्ता, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये महादेवराव महाडिक यांनी केलेली मदत, बाराही तालुक्यात असलेले निवडक कार्यकर्ते या सगळ्यांना सोबत घेवून जाण्यासाठी हातात एखादे राजकीय पद आवश्यक होते. ते महाडिक यांना मिळाले. त्याचा वापर ते भाजपसाठी कसा करणार हे येणार काळच ठरवेल.