राम मगदूम । गडहिंग्लज : दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी सलग चौथ्यांदा बिनविरोध होणार आहे. सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. सोमवारी (२८) एकत्र जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सन २००४ पासून येथे एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावेळीही कायम ठेवण्याचा निर्णय प्रमुख मंडळींनी घेतला आहे. त्यासाठी खास सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. त्यात लक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष ए. डी. पाटील, माजी सरपंच ए. वाय. पाटील व अजित पाटील, आनंदा पाटील, ज्ञानदेव भंगे, कृष्णा शिखरे, सदाशिव पाटील यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक सलग तीनवेळा बिनविरोध झाल्यामुळे गावातील विकासकामांना चालना मिळाली. गावातील भांडण - तंटे आणि कोर्ट - कचेऱ्यांच्या फेऱ्याही बंद झाल्या. नळपाणी पुरवठा योजना, हनुमान मंदिर बांधकाम, शाळा दुरूस्ती, पिकअप शेड, अंतर्गत रस्ते आदी प्रमुख कामे मार्गी लागली आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपसह सर्वच पक्ष - गटांचे सक्रीय कार्यकर्ते गावात आहेत. परंतु, सर्व मंडळी एकत्र येऊन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करतात. हेच या गावचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे यावेळची निवडणूकही बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबईकरांचे योगदान मोलाचे
गावातील सर्व विधायक कामात बहुमोल योगदान राहिलेल्या मुंबईकर ग्रामस्थ मंडळाचाही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यात मोलाचा वाटा आहे. राजकीय संघर्षाला कायमची मूठमाती मिळावी आणि सर्व गावकरी गुण्या-गोविंदाने नांदावेत, असा त्यांचा आग्रह असतो. त्याला गावकरीही मनापासून साथ देतात.