शिरोली : डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने शिये फाटा येथे झालेल्या अपघातात वडगाव न्यायालयातील महिला लिपिक वैशाली अजित पोळ (वय ४०, रा.मराठा काॅलनी, कसबा बावडा) या जागीच ठार झाल्या. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:४० वाजता घडला. अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, वैशाली पोळ या गेल्या तीन वर्षांपासून वडगाव न्यायालयात लिपिक पदावर काम करीत होत्या. दररोज त्या कसबा बावडा ते पेठवडगांव न्यायालयात आपल्या दुचाकीवरून जातात आणि परत सायंकाळी घरी येतात. बुधवारीही पोळ या वडगाव न्यायालयातून सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या गाडीवरून घरी येण्यासाठी निघाल्या. ६:४०च्या सुमारास शिये फाटा येथून कसबा बावड्याच्या दिशेने येत असताना, याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने पोळ यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात पोळ या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोके फुटून त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर डंपर चालक डम्पर घेऊन शियेच्या दिशेने वेगाने पसार झाला. या अपघातानंतर शिये फाटा येथील टपऱ्या बंद झाल्या आणि अपघातस्थळी गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. शिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूककोंडी सुरळीत केली, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.पोळ यांच्यापश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अपघाताची वार्ता समजताच, वडगाव न्यायालयातील पोळ यांचे सहकारी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करीत आहेत.
डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक, शिये फाटा येथे महिला जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 1:05 PM