कोल्हापूर : गौण खनिज परवाना त्वरित द्यावा, ऑनलाईन रॉयल्टी चलन स्वीकारण्यात यावेत, गौणखनिजावरील दंड आकारणी व वाहनावरील दंडाची कारवाई स्थगित करावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या डंपरवर वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे सजीव दर्शन घडवत वस्तुस्थिती मांडण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.दगड खाण मालक, स्टोन क्रशर मालक, डंपर मालक व कामगार कुटुंबीयांना वेठीला धरणाऱ्या शासनाच्या गौेण खनिज संबंधित धोरणाविरुद्ध गाढव-डंपर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, गाढवांना यात समावेश न करता डंपर मोर्चाचा निर्णय झाला. यात दोनशेहून अधिक डंपर सहभागी करण्यात आले. त्यापैकी वीस डंपरना शहरात प्रवेश दिला.
उर्वरित डंपर बाजार समितीजवळ पोलिसांनी थांबविले. मोर्चात प्रतिकात्मकरीत्या एक (ट्रेलर) डंपर मोर्चात सहभागी करण्यात आला. यावर सजीव चित्ररथ साकारण्यात आले. टोप येथून निघालेला हा मोर्चा दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी समाजातील प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.या निवेदनात गौण खनिज परवान्याची मुदत एक वर्षासाठी ठेवावी, मौजे टोप येथील गायरान पडीक जमिनीमधील बेघर वडार समाज व कामगार यांची घरे कायम करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, लीज खाणपट्टा करताना नगररचना कार्यालयाची नाहरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, समाजास शासकीय जमिनीत उत्खननास परवानगी मिळावी, अशा जमिनी समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी राखीव ठेवाव्यात.
संबंधित दोषी गौण खनिज यंत्रणेतील अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मोहन पाटील, हणमंत पाटील, रंगराव भोसले, रमेश पोवार, संभाजी पोवार, अविनाश कलकुटगी, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.