‘बाबाचा राग सातवें आसमान पर आहे आज... शेण खाल्लंय वाटतं कुणीतरी... चांगलंच शेण खाल्लंय...’ जेवायला बसायची तयारी करताकरता गंधालीनं वाक्य टाकलं. जवळपास दीडेक तासापासून विनीतच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या ऑफिसकॉलमधल्या मधेमधे तडतडणाऱ्या लाह्यांमुळं तिनं हा निष्कर्ष काढला होता आणि नवरा चिडलाय म्हणजे नक्की काहीतरी तितकं गंभीर असणारच याची तिला खात्री वाटत होती. एरवी अत्यंत साखराळलेला आवाज आणि शब्दांमध्ये ‘तू अत्यंत गाढव आहेस’ असं हाताखालच्यांना अप्रत्यक्षरीत्या सांगून वर पुन्हा त्यांच्याकडूनच कामही करून घेण्याचं विनीतचं कसब या लॉकडाऊनमुळं तिच्या चांगलंच अनुभवास येत होतं. खरंतर त्याच्या या गुणवत्तेचं कौतुक वाटण्यापेक्षा समोरच्याकडं स्वत:चा अपमान कळण्याचं चातुर्य कसं नाही हा मुद्दा गंधालीला जास्त विचारात टाकायचा. न राहावून तिनं एकदा त्याला हा प्रश्न विचारलाही होता त्यावर तिनंही काहीतरी गाढवपणाच केल्याचा लुक तिला देत तो हसून म्हणाला होता, ‘तेवढं चातुर्य असतं तर गाढवपणानं काम करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता ना!’
गंधाली म्हणाली होती, ‘अरे, एवढी नावाजलेली कंपनी तुमची... सगळे स्कॉलर्सच असतात ना तिथं?... मग हा गाढवपणा शिरतोच कुठून?’
त्यावर विनीत सहसा नसायचा त्या उसळत्या आवेशात म्हणाला होता, ‘बुद्धीमांद्य नाहीये गं हे... वृत्ती आहे ही, वृत्ती! कुणीकडून तरी काहीतरी करून एकदा बॉसच्या तोंडावर काम फेकायचं ही नाठाळ वृत्ती असणारे जे महाभाग असतात ना त्यांच्याबाबतीत येतो हा प्रॉब्लेम! खरंतर तल्लख बुद्धी असते त्यांच्याकडं, पण ती वापरायचीच नाही म्हटल्यावर काय होणार? मी बोललेलंही कळत नसेल असं नाही... पण कशाचंच फार काही वाटून घ्यायचं नाही असा त्यांच्या भाषेत ‘कूलपणा’ अंगी बाणलेला असतो त्यांनी!’
‘पण त्यांच्या त्या कूलपणावर निखारे ठेवत त्याला हवं तसं मोल्ड करायचं कसब असलेला तुझ्यासारखा आदरणीय बॉस त्यांना मिळाल्यानं त्यांच्यासाठी सगळा फ्लॉप शोच की!’ असं गंधालीनं तोंडातल्या तोंडात पुटपुटलेले नशीबानं विनीतला ऐकू गेलं नाही. ‘काय म्हणालीस?’ असं त्यानं विचारल्यावर ‘कठीण आहे रे! सचोटीनं काम करायची संकल्पना पूर्णच धुळीस मिळतीये की काय असंच वाटतंय रे’ असं म्हणत तिनं विषय वळवला होता.
आज मात्र फारच ‘कूल’ असं कुणीतरी विनीतच्या वाट्याला आलं होतं हे निश्चित! थोड्या काळासाठी कॉलवर जॉईन झालेला त्याचा बॉस आणि तो, दोघं संगनमतानंच घेतल्यासारखा अगदी एकतानतेनं त्या कुण्या गाढवाचा समाचार घेत असल्याचंही तिनं थोड्या वेळापूर्वी ऐकलं होतं. आता हा वेळेत पानावर बसून गरम जेवेल की सगळं गारढोण होऊन जाईल? या विचारानं कावून तिनं ते कुणीतरी शेण खाल्ल्याचं वाक्य टाकलं होतं. त्यावर कन्यका जोरात हसल्यावर चिरंजीवांनी ‘मॉम, काय म्हणालीस? मला सांग ना...’ असा लकडा लावल्यावर शेवटी एकदाची ती म्हणाली, ‘शेण खाल्लंय रे आज कुणीतरी... म्हणून बाबा वैतागलेले दिसताहेत!’ तोवर कसं काय कोण जाणे, अचानकच कॉल संपून विनीत डायनिंग टेबलाशी आला आणि सुकन्या त्याच्या कानाशी लागून काहीतरी कुजबुजली.
त्यावर विनीत उसळून म्हणाला, ‘गेले चार दिवस तरी मी दुपारचं काहीही खाल्लेलं नाही... भडंग कुणी खाल्लं, संपवलं मला काहीही माहीत नाही? तुम्हीच खाता ते खाता आणि संपलं तर पिशव्या टाकून द्यायची, डबा धुवायला टाकायचीही तसदी घेत नाही आणि नाव तेवढं माझं घेता!’ गंधालीला काहीच टोटल न लागल्यानं ती त्याच्याकडं पाहात नेमकं काय घडतंय हे समजून घ्यायच्या प्रयत्नात होती तोवर कार्टी आता सरळ मोठ्या आवाजातच म्हणाली, ‘बाबा, भडंग नव्हे... काऊडंग हो... काऊडंग!’
तारसप्तकात पोहोचत नवरा ओरडला, ‘काऊडंग खायला गाढव आहे का मी?’
आता गंधालीचे चिरंजीवही तलवारीला धार लावण्यात मागं न राहाता म्हणाले, ‘बाबा... आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ डॉन्की ईटिंग काऊडंग... गाढव कुठं खातं काऊडंग?’
’ओके... म्हणजे मी गाढव आहे हे गृहीत आहे...’ विनीत तिरमिरीत म्हणाला.
’बाबा... तुमच्याबद्दल नाही, तुमच्या स्टेटमेंटबद्दल बोलतोय मी...’ चिरंजीव मागं हटायला तयार नव्हते.
’अक्कल नको तिथं पाजळण्यातच वाया घालवा तुम्ही लोक... बोला काहीही...’ विनीतचा वैताग!
यावर ‘बाबा... तो काही नाही म्हणाला... आई म्हणाली की तुम्ही काऊडंग खाल्लं!’ या कार्टीच्या वाक्यानं अचानकपणे तलवारीचं पातं गंधालीच्या गळ्याशी आलं आणि आपण तोफेच्या तोंडी उभ्या असून कुठल्याही क्षणी आता बत्ती पेटून आपल्या ठिकऱ्या होऊ शकण्याची साक्षात अनुभूती घेत असल्यासारखं तिला वाटू लागलं. तरीही हिम्मत राखून जमेल तेवढ्या धिटाईनं गंधाली म्हणाली, ‘मी कधी गं म्हणाले असं?’
त्यावर कन्यका एकदमच न्यायाची बाजू घेतल्यासारखी छद्मी हास्य करत मानभावीपणे म्हणाली, ‘डोन्ट लाय मा... शेण खाल्लं म्हणालीस की तू... मागं एकदा मे महिन्यात आजीनं आम्हाला गाय दाखवायला नेलं होतं. तेव्हां कळलं मला की, काऊडंगलाच शेण म्हणतात.’