कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना संपल्यानंतर मैदानातील वाद उफाळून हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाईटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, चहाटपरी आदींची मोडतोड केली होती. याप्रकरणी दिलबहार आणि पाटाकडील तालमीच्या ३० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चौघांना सोमवारी अटक केली.संशयित अनिकेत अनंत सावंत (वय २३), आशिष जोतीराम जमदाडे (२८), स्वप्निल विनायक माने (२५, तिघे, रा. रविवार पेठ, कोल्हापूर), इचिबेरी युझुची इमॅन्युअल ऊर्फ चिमा (२९, रा. मूळ नायजेरियन, सध्या सणगर गल्ली, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. अन्य संशयित नीलेश जाधव, धनाजी सूर्यवंशी, शशांक माने, अक्षय फाळके, शैलेश माने, महेश पाटील, अजय शिराळे, बंटी कावणेकर, धीरज बालगुडे आदींची धरपकड सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.गेले काही दिवस येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर श्री बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या. रविवारी पाटाकडील तालीम आणि दिलबहार तालीम यांच्यात अंतिम सामना चुरशीचा झाला; पण मैदानातील खेळाडूंतील इर्र्ष्येपेक्षा दोन्ही संघांतील समर्थकांत असभ्य भाषेत वक्तव्ये करत निर्माण झालेली इर्ष्या शिगेला पोहोचली. सामना संपल्यानंतर दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांच्यात राडा झाला.
यावेळी रस्त्याकडेच्या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. यावेळी दगड भिरकावल्याने भारत राखीव बटालियनचा पोलीस कर्मचारी विकास शंकरराव हिवाळे, कमलेश भगवानभाई मारडिया (रा. रूईकर कॉलनी), विशाल सुनील जाधव (रा. आझाद गल्ली) हे तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून रविवारी रात्री उशिरा सार्वजनिक मालमत्ता नुकसान व इलेक्ट्रिक अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बाजीराव पाटील यांनी फिर्याद दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण तपास करत आहेत.