कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने खासदार संभाजीराजे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ११) कोल्हापुरात ‘संवाद दुर्गवीरांशी’ ही दुर्ग परिषद आयोजित केली आहे. त्यामध्ये राज्यभरातून सुमारे २२५ दुर्गप्रेमी, संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती या महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत आणि सदस्य सुखदेव गिरी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मेन राजाराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी अकरा वाजता शहाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते दुर्ग परिषदेचे उद्घाटन होईल. दोन वर्षांपूर्वी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावर दुर्ग परिषद घेतली होती. त्यामध्ये सहभागी संस्था, दुर्गप्रेमींच्या संघटनांनी केलेल्या कामगिरीचा आढावा कोल्हापुरातील या परिषदेत घेतला जाणार आहे. गडकोट संवर्धनाबाबत इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमींची मते, भूमिका ऐकून घेतल्यानंतर काही ठराव केले जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात जलदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट असे ३५० किल्ले आहेत. त्यातील काही किल्ले केंद्रीय पुरातत्त्व, काही राज्य पुरातत्त्व, तर काही वन विभागाकडे आहेत. वन विभागाकडील किल्ले पुरातत्त्व विभागाकडे देण्याची मागणी या परिषदेत केली जाईल. खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्ग परिषदेचा समारोप होईल, असे गिरी यांनी सांगितले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे, संजय पोवार, विनायक फाळके, धनंजय जाधव, राम यादव, योगेश केदार आदी उपस्थित होते.
दरम्यान, एस. एस. सॉकर स्कूलतर्फे गुरुवारी फाईव्ह साईड टर्फ फुटबॉल स्पर्धा मंगळवार पेठेतील टिकी टाका टर्फ ग्राऊंडवर होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
चौकट
गडकोटांच्या महितीचे डिजिटायझेशन
संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रातील विविध गडकोट किल्ल्यांची माहिती संकलित करून तिचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. संकलित झालेली माहिती ॲपच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.