कुंभोज : कुंभोज नजीकच्या दुर्गेवाडी धरणग्रस्त वसाहतीसाठी तत्कालीन कृषी व पणन सदाभाऊ खोत यांच्या विशेष प्रयत्नातून ७५ लक्ष रुपये खर्चून साकारलेली राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झाली आहे. परिणामी दुर्गेवाडीकरांचे पस्तीस वर्षाचे पिण्याच्या पाण्याचे परावलंबित्व आता संपल्याने हक्काचे पाणी मिळणार असल्याने नागरिकांत समाधान पसरले आहे. तथापि, प्रस्तावितअंतर्गत नळजोडण्यांसाठी निधी मिळणे गरजेचे आहे.
कुंभोज-हिंगणगाव दरम्यान वसाहत क्र. १, तर दानोळी मार्गावर वसाहत क्र. २ वसली आहे. दुर्गेवाडीस आजवर स्वतंत्र नळपाणी योजना नसल्याने आजवर कुंभोजच्या पाणीयोजनेचा आधार मिळाला. दोन्ही वसाहतीसाठी २०१८ मध्ये माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जि.प. सदस्य प्रवीण यादव यांच्या प्रयत्नाने तत्कालीन कृषी विपणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून नळपाणी योजनेस मंजुरी मिळविली.
खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे यांच्या प्रयत्नातून वीजजोडणीसाठी सहा लाख रुपये निधी मिळाला. अद्यापही दोन्ही वसाहतींसाठी अंतर्गत नळजोडण्या जुन्याच आहेत. तथापि, ग्रामपंचायतीने दोन्ही वसाहतींसाठी अंतर्गत नळजोडण्यांसाठी जलमिशन योजनेंतर्गत पाठविलेला सुमारे पन्नास लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. हा निधी तत्काळ मिळणे गरजेचे आहे.