कोल्हापूर : भाजपची सत्ता असताना आम्हाला कोणताही जादा निधी मिळालेला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमच्यावर नाहक आरोप करू नयेत. आमच्या सदस्यांना निधीबाबत आम्हांला विचारणा करण्याचा अधिकार आहे. त्यांना कुणालाही फसविण्याचा प्रश्न येत नसल्याचा पलटवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केला आहे.माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, राजू मगदूम यांनी सत्तारूढ पदाधिकारी त्यांच्याच सदस्यांना फसवत असल्याचा आरोप केला होता. त्याला या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी उत्तर दिले.भाजपच्या काळात दोन नंबरचे मंत्रिपद असूनही जादा निधी मिळाला नाही.
उलट हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी चौथा मजला, चार पंचायत समित्यांसाठी फर्निचर, २५/१५, जिल्हा नियोजन समिती यातून निधी उपलब्ध करून दिला. विरोधकांनाही १०/१० लाख रुपये दिले आहेत असे बजरंग पाटील यांनी सांगितले.सतीश पाटील म्हणाले, आम्ही विरोधक असताना जिल्हा परिषदेत बसण्यासाठी जागा मागितली होती. याबाबत चर्चाही झाली होती. तेव्हा तशी पद्धत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आता त्यांनीही जागा मागणी केली आहे. परंतु, पहिल्यापासून पद्धत नसल्याने त्यांना तरी जागा कशी देणार? असे सांगून विरोधकांना बसण्याला जागा देण्याचा मुद्दा निकालात काढला..एका गावात २०० सायकल्स कशा ?याआधी महिला आणि बालकल्याण समितीकडून एका एका गावात १५०/२०० सायकल्स दिल्या गेल्या आणि शेजारच्या गावात एकही सायकल दिली गेली नाही. निधी राहू दे आम्हांला मान सन्मानही दिला नाही. म्हणूनच आम्हांला बाहेर पडावे लागले असे यावेळी स्वाभिमानीचे राजेश पाटील यांनी सांगितले. यावेळी सभापती डॉ. पद्माराणी पाटील या उपस्थित होत्या.