कोल्हापूर : अवैधरित्या गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तरुणास अटक केली, तर त्याच्या एका साथीदारावरही गुन्हा नोंदवला. चिन्मय अरुण वेलणेकर (वय १९, रा. सातपुते गल्ली, हत्ती चौक, इचलकरंजी) असे अटक केलेल्या संशयिताचे, तर तुषार राजू साळुंखे (रा. व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या साथीदाराचे नाव आहे.
बुधवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांच्यावतीने संभाजीनगर परिसरात नाकाबंदीवेळी वाहनांची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून तीन हजार रुपये किमतीचा २५५ ग्रॅम गांजा, ७५ हजाराची दुचाकी व १० हजाराचा मोबाईल असा सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी बुधवारी रात्री संभाजीनगर परिसरात नाकाबंदी करून पोलीस पथकामार्फत वाहनांची तपासणी केली. त्याचवेळी एका संशयिताच्या मोपेडची तपासणी सुरू असताना त्या मोपेडच्या डिक्कीत सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या २५५ ग्रॅम गांजाची पुडी सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील मोपेड, मोबाईल असा सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याचा साथीदार तुषार साळुंखे याने आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघाही संशयितांवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियमअन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तुषार साळुंखे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मिळाला नाही.