इचलकरंजी : शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभारी नगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शहरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात प्रभारी नगराध्यक्ष पोवार यांनी बैठक बोलावली होती. यावेळी तासभर चाललेल्या बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चर्चेअंती एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरात ९९ शुद्ध पेयजल प्रकल्प मंजूर झाले, असून, त्यापैकी ४६ प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी ५ प्रकल्पांतून आठ दिवसात प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बांधकाम व पाणीपुरवठा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने रस्ते करताना ड्रेनेजची अनेक झाकणे बाजूला पडली असून, ड्रेनेज पूर्ण भरलेली आहेत. तसेच गॅस पाईपलाईन टाकणेसाठी जागोजागी खुदाई करताना पाण्याची पाईपलाईन फुटून गळती लागते. त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
बैठकीस पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश मोरबाळे, विठ्ठल चोपडे, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.