कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती.आदि शंकराचार्यांची ज्ञानदात्री आराध्या म्हणजे शारदादेवी. या ज्ञानदेवतेचे पीठ कर्नाटकातील श्रृंगेरी इथे आहे. शारदांबेची अनेक स्तवने शंकराचार्यांनी रचलेली आहेत. शारदाभुजंगप्रयात हे त्यातलेच एक रूप. भुजंगप्रयात हे काव्यरचनेमध्ये वृत्त आहे. शारदाभुजंगप्रयातामध्ये शंकराचार्यांनी आठ श्लोकांची रचना केली आहे.
या स्तोत्रातील श्लोकाचा अर्थ असा : जिचा देह अतिशय सुंदर आहे. जी शांतस्वरुप आहे. जिचे सुंदर केस रुळत आहेत, जी चिंतनाच्याही पलिकडे आहे जी एखाद्या वेलीप्रमाणे नाजूक व वाढत राहणारी आहे. जिचे स्वरुप सृष्टीच्या आधी निर्माण झाले असून तापसी योगी जिचे ध्यान करतात अशा माझ्या त्या अनंतस्वरुपी शारदामातेची मी पूजा व भजन करतो. स्मरण करतो. या वर्णनानुसार शुक्रवारी अंबाबाईची पूजा बांधण्यात आली. ही पूजा मंदार मुनिश्वर, मयुर मुनिश्वर व रवि माईणकर यांनी बांधली.