कोल्हापूर : भारतीय सैन्यदलाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरतीला आलेल्या उमेदवारांसाठी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखवत मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूरकरांचा हा अनोखा पाहुणचार पाहून उमेदवार भारावून गेले आहेत.
सैन्य भरतीसाठी येणारे बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील आहे. सैन्य भरतीसाठी लक्षणीय गर्दी असल्याने येथील खानावळ, हॉटेल मोठी गर्दी आहे. त्यामुळे उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये या उद्देशाने बुधवारी हिंदू एकता आणि ‘क्रिडाई’कडून मोफत जेवण देण्यात आले. बुधवारी झालेल्या भरतीमध्ये सातारा जिल्ह्णातील तीन तालुक्यांतील उमेदवार सहभागी झाले होते. बुधवारी झालेल्या सैन्यभरतीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या ५ हजार ८२९ उमेदवारांपैकी प्रत्यक्षात ५००८ उमेदवारांनी भरतीसाठी हजेरी लावली.
राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर हिंदू एकता आंदोलन याच ठिकाणी जेवण तयार करून उमेदवारांना वाटप करण्यात आले. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रांत सरचिणीस लालासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष गजानन तोडकर, संजय साडविलकर, हिंदुराव शेळके, सूरज काकडे, प्रकाश आयरेकर, बाळासाहेब मुधोळकर, दीपक मगदूम, अजित गायकवाड, नवनाथ चव्हाण हे उपस्थित होते. आज, गुरुवारीही हिंदू एकतातर्फे उमेदवारांना जेवण दिले जाणार आहे.
बुधवारी क्रिडाई कोल्हापूरतर्फे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांच्या हस्ते रात्री जेवण वाटप करण्यात आले. याचा लाभ एक हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला. गेले आठवडाभर सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत ‘क्रिडाई’च्या वतीने अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, खजानिस सचिन ओसवाल, जॉइंट सेक्रेटरी रविकिशोर माने, कृष्णा पाटील, संदीप मिरजकर, गणेश सावंत, रवी पाटील, विलास आवटी, आदित्य बेडेकर हे उपस्थित होते.शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरतीतील उमेदवारांसाठी राजाराम महाविद्यालयांच्या मैदानावर हिंदू एकता आंदोलनतर्फे बुधवारी मोफत जेवण देण्यात आले. दुसऱ्या छायाचित्रात क्रिडाई कोल्हापूर यांच्यातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व ‘क्रिडाई’चे पदाधिकारी यांच्या हस्ते जेवण्याच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले.