कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, दोन महिन्यांपूर्वी बंद झालेली सेंटर्स पुन्हा खुली करण्यासाठीची यंत्रणा कामाला लागली आहे. व्हेंटिलेटरवरची धूळ झटकली जात असून, कोविड केअर सेंटरची सॅनिटायझरसह स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली असून, यात नाइट कर्फ्यूसह महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पावसाळ्यात कहर केला होता. तेव्हा जिल्ह्यात ५१ कोविड केअर सेंटर, १२ हेल्थ सेंटर, सहा कोविड हॉस्पिटल, अशी यंत्रणा अहोरात्र राबत होती. दिवाळीनंतर कोरोनाचा जोर ओसरल्याने रुग्णसंख्या कमी होईल तसतशी ही सेंटर बंद होत गेली. आजच्या घडीला फक्त सीपीआर, इचलकरंजीचे आयजीएम, गडहिंग्लजचे ग्रामीण रुग्णालय अशा तीन ठिकाणीच कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात ५० हजार १७४ जणांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी १७३६ जणांचा मृत्यू झाला, तर ४८ हजार २८६ जण बरे झाले. सध्या या तीन रुग्णालयांत १५२ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा आकडा वाढत चालल्याने मोठमोठ्या शहरांमध्ये पुन्हा संचारबंदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. पुणे व आजूबाजूच्या शहरात रात्रीची संचारबंदी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही संचारबंदी लागू होणार का, याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या मास्क सक्तीसह सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठीचे सभा समारंभासाठीचे नियम अधिक कडक केले आहेत.
संचारबंदीविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, केअर सेेंटरमधील डॉक्टर, सीपीआरचे अधिकारी हे सर्व या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यासह संचारबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.