कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नियोजित सत्तारूढ आघाडीव्यतिरिक्त केवळ दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे. आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी धाडसी निर्णय घेत नऊ विद्यमान संचालकांना डच्चू दिला तर दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ संचालकांसह दहा नव्या उमेदवारांसह त्यांच्या डमी अर्ज केलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्याकडे अर्ज दाखल केले. आजरा अर्बन बॅंकेच्या प्रतिभानगर शाखेमध्ये निवडणूक कार्यालय उघडण्यात आले आहे. आघाडीकडून ज्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांच्याच घरातील एखाद्याचा अर्ज डमी म्हणून भरण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता छाननी होणार आहे.
अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. चराटी यांचे बंधू अजित हे संचालक मंडळात होते. परंतु, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी अशोक चराटी हे संचालक मंडळात असतील. बॅंकेचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहिलेल्या काशिनाथ भुसारी आणि विश्वनाथ महाळंक यांच्या मुलांना चराटी यांनी नव्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. आदम पठाण यांनी सर्वसाधारण गटातून आणि मलकापूरचे प्रवीण प्रभावळकर यांनी दोन गटातून आपले अर्ज दाखल केले आहेत.
चौकट
सत्तारूढांकडून निश्चित करण्यात आलेली नावे -
अशोक चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, दीपक सातोस्कर, प्रकाश वाटवे, अनिल देशपांडे, रमेश कुरूणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारूती मोरे, आनंदा फडके, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, प्रणिता केसरकर, शैला टोपले, संजय चव्हाण
चौकट
यांना वगळले
विजयकुमार पाटील, बाबू लतीफ, सुधाकर पांडव, मधुकर भारती, उषा देसाई, सुरेश गड्डी, आर. डी. पाटील कोल्हापूर, कृष्णकांत कांदळकर, अशोक पाटील.
चौकट
१३ जानेवारीला सर्वसाधारण सभा
मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या नियमानुसार दिनांक १३ जानेवारीला दुपारी ३ वाजता आजरा हायस्कूलच्या मैदानावर बॅंकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. दिनांक ११ जानेवारीपर्यंत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिले तर या सर्वसाधारण सभेत निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येईल. मात्र, तसे झाले नाही तर सभा तहकूब करून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.