शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नेहमीच सामाजिक कामात पुढाकार असतो. कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने आज, सोमवारी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आली.
यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासन तसेच साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांनी कोविड रुग्णालय उभारून या महामारीच्या परिस्थितीत शासनास मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार ‘दत्त’ने सेंटर उभारले आहे. गेल्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ‘दत्त’ने कोविड सेंटर उभारून रुग्णांना मोठा दिलासा दिला होता. सर्व अत्यावश्यक सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याची दखल शासनाने घेऊन या सेंटरचे कौतुक केले होते.
कोट - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुन्हा एकदा दत्त समूहाने सामाजिक बांधीलकी जपत कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी आपल्या भागामध्ये प्रथमच असे कोविड सेंटर सुरू होत आहे. या सेंटरचा फायदा सर्वांनाच होणार आहे.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष दत्त उद्योग समूह. फोटो - ११०४२०२१-जेएवाय-०४-गणपतराव पाटील