'दत्त'चा क्षारपडमुक्त पॅटर्न देशभर राबविणार : केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे
* शिरोळ दत्तच्या क्षारपडमुक्त प्रकल्पाचे कौतुक
शिरोळ : दत्त कारखान्याने राबविलेला क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न नक्कीच आदर्शवत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने केंद्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात क्षारमुक्त जमिनीचा प्रकल्प सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राबवून येणाऱ्या काळात देशभर राबवू, अशी ग्वाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली.
शिरोळ येथील श्री दत्त कारखान्याच्यावतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्नातून कार्यक्षेत्रात राबविला जात असलेला क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री मुर्गेश निराणी यांनी खास बाब म्हणून दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना निमंत्रित केले होते. बंगलोर येथे झालेल्या बैठकीस केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थित होत्या. यावेळी कारखान्याच्यावतीने प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री निराणी यांनी अशा पद्धतीचा प्रकल्प किमान दहा राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी कृषी राज्यमंत्री करंदलाजे यांनी या प्रकल्पाची यशस्वीता व शेतीच्या दृष्टीने महत्त्व विचारात घेऊन प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर केंद्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात क्षारमुक्त जमिनीचा प्रकल्प राबविणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या जमिनी या प्रकल्पामुळे उत्पादनक्षम होत आहेत, ही बाब कौतुकास्पद असून हा प्रकल्प देशपातळीवर राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा, रामन रेड्डी, दलवाई, अरुण देसाई, इंद्रजित पाटील, बाहुबली पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे उपस्थित होते.
फोटो - २७०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - बंगलोर येथे दत्त कारखान्याच्या जमीन सुधारणा प्रकल्पाची माहिती दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा, रामन रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.