कोल्हापूर : येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा अकरावा दीक्षांत कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सयाजी हॉटेल येथे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. नवी दिल्लीतील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनरिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंके हे प्रमुख पाहुणे असतील.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे संपादक वसंत भोसले, जम्मू-काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा गांगुली यांना डी.लीट पदवीने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. मुदगल म्हणाले, दीक्षांत कार्यक्रमात एकूण ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी देण्यात येणार आहे. आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बाचेरी येथील डॉ. नवनाथ पडळकर या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी.वाय. पाटील विद्यापीठ एक्सलन्स इन रिसर्च अवाॅर्ड जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यापीठाकडून पीएचडी प्राप्त बहुसंख्य विद्यार्थी देश- विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
- वसंत भोसलेवसंत भोसले हे ज्येष्ठ पत्रकार असून लोकमत या आघाडीच्या मराठी दैनिकाचे संपादक आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा ते लेखणीतून जपत आहेत. तंबाखू उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनातही ते सहभागी होते. ‘जागल्या’ची भूमिका घेऊन ते लिहित असलेले ‘जागर’ हे सदर वाचकप्रिय आहे. ‘सह्याद्रीचा वारसा’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले असून ‘यशवंतराव चव्हाण- नव महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत.- शाहिदा गांगुलीजम्मू- काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा गांगुली भारत- पाक सीमेवरील मंडी येथे एका मुस्लीम कुटुंबात जन्म झाला. केवळ चार वर्षांच्या असताना त्यांचे पितृछत्र हरपले. अनेकदा दहशतवादी हल्ल्याच्या झळा त्यांना सोसाव्या लागल्या. यातूनच त्यांनी पोलिस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सन १९९५ मध्ये त्या जम्मू- काश्मीर पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. दहशतवाद्यांविरोधात त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. तब्बल ९० दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला आहे. शहीद जवानांचे कुटुंबीय, अनाथ आणि विधवा यांच्यासाठी त्या काम करतात.