कोल्हापूर - श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराअंतर्गत केल्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी आवारात दोन ई बाईक्स फिरणार आहेत. बेंगलोर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यातील ही बाईक अंबाबाई चरणी अर्पण केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
अंबाबाई मंदिरातील निर्माल्य, लाडू प्रसाद व अन्य वाहतुकीसाठी अनेकदा मंदिराच्या आवारात वाहनांची ये जा सुरू असते. मंदिर परिसर प्रदूषणमुक्त कण्यासाठी देवस्थान समितीकडून प्रयत्न केले जात आहेत. मंदिरामध्ये रोज भाविकांकडून अर्पण होणारे हार व फुले तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होते. हे निर्माल्य मंदिराबाहेर नेण्यासाठी व लाडू प्रसाद तसेच अन्य साहित्य ने-आण करण्यासाठी दोन बाइक घेण्याचे समितीने ठरवले होते. सेवा योजनेअंतर्गत साडे चार लाख किमतीच्या बॅटरीवर चालणाऱ्या दोन पुष्पक हायड्रोलिक वाहने शुक्रवारी अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आल्या. त्यापैकी पहिली गाडी लाडू वाहतूकीसाठी सुरू करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, के. रामराव तसेच देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.