म्हालसवडे : शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी ॲपद्वारे गटनंबरनुसार वेगवेगळ्या पिकांची नोंदणी कशी करावी? याबाबतचे मार्गदर्शन म्हालसवडे (ता. करवीर) येथे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पिकाच्या बांधावर जाऊन देण्यात आले. तलाठी वाशिमराज मुल्ला व कोतवाल गणपती कुंभार यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
ई-पीक पाहणी प्रबोधन सप्ताह सुरू असून, यामध्ये पीकपेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्र्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड केल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांची माहिती भरावयाची आहे. वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी केल्यानंतर गट व खातेनंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांची छायाचित्रे काढून ते अपलोड करावे लागत आहे. शेतकऱ्र्यांनी आपल्या पिकांची नोंदणी करून ई-पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन या वेळी म्हालसवडेचे सरपंच संदीप कांबळे यांनी केले. या वेळी पोलीस पाटील सागर शिंदे, अशोक निकम, गणेश पाटील, संदीप पाटील, शंकर पाटील, विष्णू पाटील, ईश्वरा भोसले, ज्ञानदेव पाटील व कांचनवाडी, म्हालसवडे, सोनाळी आणि पाटेकरवाडी या चार गावातील शेतकरी उपस्थित होते.