कोल्हापूर : प्रशासनाचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा आणि सर्वसामान्य जनतेची कामे सुलभपणे लवकरात लवकर व्हावीत यासाठी महानगरपालिका कामकाजात ‘ई कार्यालय’ पद्धत राबविण्याला आपला प्राधान्यक्रम राहील, असे महानगरपालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रस्थापित उत्पन्नस्रोतांसह अन्य नवे पर्याय शोधून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याकडेही आपले विशेष लक्ष असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्णातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले पी. शिवशंकर २००८ मध्ये आय. आर. एस. परीक्षा उत्तीर्ण झाले; परंतु आय. ए. एस. होण्याचे ध्येय बाळगल्यामुळे त्यांनी आंध्रप्रदेश सरकारच्या स्टडी सर्कलमध्ये प्रवेश घेऊन ही परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात २०११ साली आय. ए. एस. झाले. सध्या त्यांचे वय अवघे ३३ वर्षे आहे. इतिहास आणि तेलगू साहित्य हे त्यांचे एम. ए.चे विषय असून, बीएस्सी. कॉम्प्युटरमधूनही त्यांनी पदवी घेतली आहे. आयएएस झाल्यानंतर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी सहा काम केले. त्यानंतर गडचिरोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. तेथून ते कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून आज, शनिवारी रुजू झाले. दुपारी पाऊण वाजता महापालिकेत येण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन चर्चा केली. काळम्मावाडी पाईपलाईन योजना लवकरात लवकर कशी पूर्ण होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आतापासूनच पाठपुरावा करणार आहे. शहरातील टोलसंदर्भात आंदोलनाची माहितीही मला मिळाली. रस्ते विकास प्रकल्पातील तांत्रिक व कायदेशीर बाबी समजावून घेण्यात येतील आणि मगच त्या संदर्भात काय करायचे ते ठरवू, असेही आयुक्तांनी सांगितले. सध्या रेंगाळलेले एस.टी.पी.चे काम लवक र पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सायंकाळी आयुक्त शिवशंकर यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पे्रझेंटेशनसह महापालिकेच्या कामकाजाची माहिती करून घेतली. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जलद कामकाजासाठी ‘ई कार्यालय’ पद्धत : पी. शिवशंकर
By admin | Published: February 01, 2015 1:03 AM