राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये दुधाची प्रत व वजन झाल्यानंतर सेकंदात ते प्राथमिक दूध संस्थांना कळणार आहे. दूध संघाने ‘ई सुविधा ॲप’ची निर्मिती केली असून, संस्थांना आता दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. आगामी काळात या ॲपशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही जोडले जाणार आहे.प्राथमिक दूध संस्थेत संकलन झाल्यानंतर ते दूध टेम्पोतून ‘गोकुळ’मध्ये पाठवले जाते. तिथे पहिल्यांदा दुधाचे फॅट, एस.एन.एफ.ची तपासणी केली जाते. त्यानंतर वजन करून ते दूध एकत्रित केले जाते. प्रत व वजनाची स्लीप दुसऱ्या दिवशी टेम्पोतून दूध संस्थांना मिळते. त्यानंतर संस्थाचालकांना आपल्या दुधाची गुणवत्ता समजते.
संकलनात काही दुरुस्ती करायची झाली तर दोन वेळचे संकलन झालेले असते. त्याचबरोबर अनेक वेळा दूध संस्थेत काढलेले फॅट व घेतलेले वजन आणि संघाकडून येणारे फॅट व वजन यात तफावत असते. काही वेळा दुधात घट येणे, दूध दुय्यम प्रतीचे येणे अशा तक्रारी दूध संस्थांच्या असतात.यामध्ये अधिक पारदर्शकता यावी, यासाठी ‘गोकुळ’ने ‘ई सुविधा ॲप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपमुळे दूध संघात दुधाची प्रत तपासणी व दुधाचे वजन केल्यानंतर सेकंदात त्याची माहिती संबंधित दूध संस्थांना समजणार आहे. यापुढे, या ॲपद्वारे पशुखाद्यासह इतर सुविधांची नोंदणीही करता येणार आहे. ‘गोकुळ’शी संलग्न जनावरांचे यापूर्वीच आधार कार्ड तयार केले आहे. एका क्लिकवर जिल्ह्यातील जनावरांची माहिती याद्वारे समजणार आहे.
अध्यक्ष, सचिव जोडले जाणारया ॲपद्वारे पहिल्या टप्प्यात प्राथमिक दूध संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना जोडले जाणार आहे. त्यानंतर दूध उत्पादकांनाही सहभागी करून घेणार आहेत. यामुळे आपल्या संस्थेची माहिती उत्पादकालाही समजण्यास मदत होणार आहे.चुयेकरांच्या पुण्यतिथीला होणार प्रारंभ‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची ९वी पुण्यतिथी १६ जानेवारीला आहे. याच दिवशी आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ‘ई-सुविधा ॲप’चा प्रारंभ केला जाणार आहे.