कोल्हापूर : शिंगणापूर थेट पाईपलाईन झाली, कसबा बावडा ते ताराराणी चौकापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली, तरी ई वॉर्ड परिसरास पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्याची कारणे काय आहेत, हे प्रत्यक्ष जाणून घेण्याकरिता महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतीच शिंगणापूर ते ताराराणी चौकपर्यंतची पाणी वितरण ठिकाणांची पाहणी केली.गेल्याच आठवड्यात भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्न बिकट असल्याची माहिती दिली होती. तसेच किमान दोन तास तरी सर्वांना समान पाणी द्यावे, त्याचबरोबर आपणही प्रत्यक्ष फिरती करून पाणी वाटपाचे नियोजन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी शनिवारी ही पाहणी केली.शहराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या ई वॉर्डला कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो, याची माहिती घेण्याकरिता आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करताना, दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शिंगणापूर जॅकवेल, बटुकेश्वर बॅक प्रेशर टँक, आपटेनगर पाण्याची टाकी, नवीन आपटेनगर संप अॅन्ड पंप हाऊस, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र, साळोखेनगर टाकी, कळंबा संप अॅन्ड पंप हाऊस, कळंबा फिल्टर हाऊस, जरगनगर टाकी, सुभाषनगर पंपिंग स्टेशन, शेंडापार्क टाकी, राजेंद्रनगर टाकी, राजारामपुरी टाकी व पंपिंग स्टेशन, राजारामपुरी मेन लाईनवरील व्हॉल्व्ह व कावळा नाका टाकी या विविध ठिकाणी भेट देऊन, वितरण व्यवस्थेची पाहणी केली.यावेळी शहरातील विविध भागांत वितरित होत असलेल्या पाणी पुरवठ्याची माहिती त्यांनी घेतली. तसेच सर्व प्रभागांत पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना दिल्या. यावेळी उपजलअभियंता रामदास गायकवाड, शाखाअभियंता अक्षय आटकर, अभिलाशा दळवी, गुंजन भारंबे, राजेंद्र हुजरे, मिलिंद पाटील, आदी उपस्थित होते.
पहिल्यांदाच आयुक्तांची फिरतीयापूर्वी अनेकवेळा ई वॉर्डातील पाणी पुरवठ्याबद्दल तक्रारी झाल्या. नागरिकांनी आंदोलने केली. नगरसेवकांनी महासभेत अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले; परंतु कोणाही आयुक्तांना हा प्रश्न नेमका काय आहे, याची माहिती घेण्याची तसदी घेतली. अधिकाऱ्यांनाच आदेश देऊन मोकळे झाले; परंतु डॉ. कलशेट्टी यांनी मात्र प्रथमच इतक्यात दीर्घ पल्ल्याचा प्रवास करीत, पाणी वितरणाची माहिती करून घेतली.