कोल्हापूर : महिला बचतगटाच्या धर्तीवर येत्या तीन महिन्यांत प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे दिव्यांगांचेही बचतगट स्थापन होणार आहेत. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, याची सुरुवात जिल्ह्यातून आलेल्या २५ दिव्यांगांना प्रशिक्षणाने झाली. यानिमित्ताने दिव्यांगांना एकमेकांच्या सहकार्याने उद्योग उभारणी करून आर्थिक प्रगती साधणे शक्य होणार आहे.जिल्ह्यात महिला बचतगटांचे विस्तृत जाळे विणले गेले आहे. मुळातच बचतीची सवय असलेल्या महिलांना या बचतगट चळवळीने सर्वच बाबतीत आत्मनिर्भर बनविले. एकटीऐवजी गटागटाने महिलांची प्रगती साधता येते, हे सिद्ध झाले; पण महिलांव्यतिरिक्त पुरुष, दिव्यांग आणि महिला आणि पुरुष असे संमिश्र बचतगट स्थापन होऊ शकतात का? याबाबत संदिग्धता व्यक्त होत होती.
दरम्यान, महात्मा गांधी सेवा संघ शाळा संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे हा विषय पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. या केंद्राच्या प्रकल्प संचालक स्वाती गोखले यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी दिव्यांगांना याबाबतीत विश्वासात घेतले; पण पुढे यांना प्रशिक्षण कोण देणार?, असा प्रश्न पुढे आला. बचतगट चळवळीत मोलाचे कार्य करणाऱ्या स्वयंसिद्धा संस्था पुढे आली. त्यांनी प्रशिक्षणाची तयारी दर्शविली आणि पहिल्या टप्प्यात २५ जणांचे प्रशिक्षण पूर्णही झाले.
व्ही. टी. पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिरोळ, गडहिंंग्लज, कोल्हापूर शहरातील दिव्यांगांनी प्र्रशिक्षण घेतले. त्यांना मार्गदर्शन करताना कांचनताई परुळेकर यांनी बचतगटामुळेच एकत्रित प्रगती साधता येते. कर्ज काढले तरच व्यवसाय करता येतो, हे चुकीचे आहे. कर्ज न काढतानाही चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू करता येतो, असे सांगून बँकांकडून काही अडचणी आल्यास माझ्याकडे या, मी निश्चित मदत करेन, असा विश्वासही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आॅफ हेरिटेजचेही सहकार्य लाभले. अंजली पाटील, शिल्पा हुजूरबाजार यांचीही उपस्थिती होती.
- राखीव पाच टक्के विकास निधीचा वापर
अशाप्रकारे दिव्यांगांनी एकत्र येऊन गट स्थापन केला, तर त्यांच्या प्रगतीची दारे उघडली जाणार आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी शासनाकडून केवळ दिव्यांगांसाठी पाच टक्के विकासनिधी राखीव ठेवला जातो. तो निधी या बचतगटाच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे खर्च करून एकाचवेळी अनेक दिव्यांगांचे कल्याण करणे शक्य होणार आहे.
- रजिस्ट्रेशनची गरज नाही
दिव्यांगांचे बचतगट स्थापन करण्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. ज्या हद्दीत बचतगट स्थापन होत आहे, त्याची फक्त कल्पना यावी, म्हणून लेखी पत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा ज्या-त्या कार्यक्षेत्रातील कार्यालयाकडे द्यावयाचे आहे.