आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाने एक महिन्यात २० लोकांचा मृत्यू; तर ५५४ जण कोरोना पॉझिटिव्ह असलेले अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ३४ पथकांमार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे सुरू केला आहे. सर्व्हेतून लवकर निदान, लवकर उपचार आणि मृत्युदर कमी केला जाणार आहे.
पथकातर्फे ऑक्सिजन व तापमान पातळी तपासणे, लक्षणे असणाऱ्या लोकांवर तातडीने उपचार करणे; खोकला, ताप, घसा दुखणे, सर्दी, आदी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तातडीने कोविड सेंटरला पाठविणे, नियोजनाप्रमाणे सर्व्हे करणे हे काम सुरू आहे.
या पथकामध्ये ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांचा समावेश आहे.
पथकाने एका दिवसात ११ गावांतील ३६३८ कुटुंबांतील १४२६७ नागरिकांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. आजच्या तपासणीमध्ये फ्लूसदृश ३८ रुग्ण, सारीचा एक रुग्ण, १३५७ व्याधिग्रस्त रुग्ण सापडले असून ६३ लोकांना आरटीपीसीआर स्वॅब देण्यासाठी कोविड सेंटरला पाठवले.
येत्या पाच दिवसांत प्रत्येक गावातील कुटुंबे व व्यक्तींचा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्यावर लवकर निदान, लवकर उपचार करुरून मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भादवण, मडिलगे, निंगुडगे, किणे, पोश्रातवाडी, महागोंड, होन्याळी, चव्हाणवाडी, उत्तूर, देवर्डे, विटे व पेरणोली गावांत पहिल्या दिवशी सर्व्हे झाला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी १८ गावांतून सर्व्हे सुरू आहे; तर त्यानंतर १९ गावांमधून सर्व्हे केला जाणार आहे.
सोमवारपर्यंत सर्व गावांतील सर्व्हे पूर्ण करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
------------------------
*
प्राथमिक आरोग्य केंद्रातून होणार अॅन्टिजेन टेस्ट
तालुक्यातील आजरा ग्रामीण रुग्णालय, उत्तूर, भादवण, मलिग्रे, वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट सुरू केली आहे. ज्यांना तातडीने कोरोनाचा अहवाल हवा असेल त्यांनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्याधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी केले आहे.
--------------------------
* मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांना पत्र
तालुक्यात जवळपास ६० ते ७० खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण वेळेत उपचार घेत नाहीत; पण सध्या चार दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण गंभीर होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी कोरोनासदृश्य रुग्ण असेल तर त्याला तातडीने कोविड सेंटरला पाठवावे. त्याच्यावर तातडीने उपचार करून मृत्युदर रोखण्यास मदत होणार आहे, असे आवाहन पत्रातून केले आहे.
-------------------------
फोटो ओळी : कोवाडे (ता. आजरा) येथे सुरू असलेला कोरोना सर्व्हे.
क्रमांक : ३००४२०२१-गड-०१