कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला शमविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात सर्वत्र दोन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यात पहिल्या दिवशी शनिवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या (के.एम.टी) १६ बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. यातून केवळ ८७२ रुपयांची कमाई झाली. तर डिझेलचा ही खर्च ही भागला नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत परिवहन सेवा आहे. या अंतर्गत कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर २० ते २५ बसेस विविध मार्गावर धावतात. त्याद्वारे पावणे सहा हजार किमी. अंतर या बसेस फिरतात. त्यातून या विभागास पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. त्यात पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केल्यामुळे पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, रुग्ण अशांची साेय व्हावी. याकरिता एकूण २५ बसेस रस्त्यावर आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी १६ बसेस विविध केंद्रांवर ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन बसेस सकाळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता सोडण्यात आल्या. त्यातून या बसेसचा डिझेल खर्च ही भागला नाही. केवळ ८७२ रुपये इतकेच मिळाले. त्यामुळे के.एम.टी.च्या १६ बसेस नियंत्रण केंद्राजवळ उभ्या असल्याचे चित्र दिवसभर होते.
चौकट
बसेसचे नियोजन असे,
लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता शिवाजी चौकात (२), शाहू मैदान (४), गंगावेश (४), महाराणा प्रताप चौक (३), मध्यवर्ती बसस्थानक (३) अशा १६ बसेसचे ,तर अत्यावश्यक सेवेतील डाॅक्टरांची ने-आण व साधन सामग्रीकरिता ७ बसेस देण्यात आल्या आहेत. याशिवाय शिरोली औद्योगिक वसाहत व कागल पंचतारांकित वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांकरिता दोन बसेसची वेगळी सोय करण्यात आली होती. त्याची एकच फेरी झाली. त्यातून ८७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशी माहिती के.एम.टी.च्या सूत्रांनी दिली.