सतीश पाटीलकोल्हापूर : भूगर्भातील टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह भारतातील विविध भागांत भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे, असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून ‘सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे’ दाखवीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.महाराष्ट्रासह उत्तर भारतात ‘ईक्यू क्लाउड' (भूकंप ढग) व धुक्याची निर्मिती होत असून, येत्या काळात महाराष्ट्रात मुंबई, कोकण किनारपट्टी, कोयना धरणक्षेत्रासह गुजरात सीमेवर, कच्छ भागात, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पट्ट्यात दिल्ली, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह-लडाख, ईशान्य भारतातील सात राज्ये, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ तसेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात मात्र हा धोका जवळपास अत्यंत कमी किंवा नाही, असे निष्कर्षदेखील प्रा़ किरणकुमार जोहरे यांनी बनविलेल्या ‘सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणां’वर मिळाले आहेत.तापमान चढउतार आणि जमिनीखाली टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने बाष्प बदल व बदल परिणामी भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत आहे. प्रा़ किरणकुमार जोहरे यांनी किमान चार प्रकारच्या भूकंप ढगांचा शोध लावला असून सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतातही भूकंप ढगांची आणि धुक्याची निर्मिती होत आहे. येत्या काळात ४ ते ८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासह समन्वयाने एकजुटीने ‘टीमवर्क’साठी आपत्कालीन व्यवस्था, नागरी संरक्षण दल, एनएसएस, एनसीसी पथकं आदींनीदेखील तयार राहण्याची अपरिहार्य व गंभीर आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपर्यंत भूकंप, हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:26 PM