कोल्हापूर, दि. ५ : केंद्र शासनाने वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लस हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होणार असून ख्ररेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. तसेच वस्तु व सेवा प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खात्रीशीररितीने उपलब्ध होणार आहेत.महासंचालक पुरवठा व विल्हेवाट ही दिनांक ३१ आॅक्टोबर पासून बंद होणार असून या संघटनेमार्फत होणारी कार्यवाही ही पोर्टलवर परावर्तित होणार आहे.सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका/ नगरपालिका/ जिल्हा परिषद/ स्वायतत संस्था/ अंगीकृत संस्था/ शासनाच्या नियंत्रणाखालील असलेल्या सर्व संस्थांना या वेब पोर्टलव्दारे खरेदीची कार्यपध्दती स्विकृत करुन लागू करण्यात आलेली आहे. सर्व संस्थाना या पोर्टलच्या माध्यमातून दि. १ डिसेंबर २0१६ रोजीच्या सुधारित खरेदी धोरणातील तरतुदींचा अवलंब करुन खरेदी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.सध्या या पोर्टलवर २५ हजार ८00 उत्पादक / पुरवठादार नोंदणीकृत झाले असून त्यांच्याकडून १ लाख १३ हजार वस्तू व १७ सेवा या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
गव्हर्मेंट ई- मार्केटप्लस पोर्टलवर खरेदीदार विभागांना व राज्यातील उत्पादक- पुरवठादारांना नोंदणीकृत होण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत असून नोंदणी करण्यासाठी पॅन क्र., आधार क्र. इत्यादी बाबी नमूद करुन खरेदीदार विभाग व उत्पादक- पुरवठादार दहा ते पंधरा मिनिटाच्या कालावधीत पोर्टलवर नोंदणीकृत होऊ शकतात.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आद्योगिक संघटना-औद्योगिक वसाहती व सर्व उद्योजकांनी जास्तीत जास्त उत्पादक व पुरवठादाराना नोंदणीकृत होण्यासाठी योग्य तो प्रचार व प्रसिध्दी करावी.