कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेत सलग अठरा वर्षे अन्नछत्राची सेवा बजावणाऱ्या सहजसेवा ट्रस्टतर्फे यंदाही १७ ते २० एप्रिलदरम्यान अन्नछत्राचा उपक्रम गायमुख येथे रात्रंदिवस राबविला जाणार आहे. किमान दोन लाखांहून अधिक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी माहिती सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे व प्रमोद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जोतिबा यात्रा शुक्रवारी (दि. १९) भरत आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, आदी राज्यांतून सहा लाखांवर भाविक यात्रेसाठी येतात. या काळात पाऊस पडला नाही तर किमान दोन लाखांहून अधिक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी अपेक्षा धरून सर्व नियोजन केले आहे. या अन्नछत्राचा गेल्या अठरा वर्षांत लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे. यात्राकाळात वळवाच्या पाऊस पडतो, हा अनुभव लक्षात घेता भाविकांची गैरसोय होते, तशीच गैरसोय अन्नछत्रातही होते. त्यामुळे अन्नछत्रासाठी गायमुख येथे १५ हजार चौरस फुटांचा मांडव (लोखंडी फॅब्रिकेटेड नटबोल्टचा) उभारण्यात आला आहे. हा मांडव अनिल काटे यांच्यातर्फे घालण्यात आला आहे. चहा व मठ्ठा तयार करण्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. महिलांच्या अंघोळीसाठी बाथरूमचीही सोय करण्यात आली. अन्नछत्राच्या समोरील मोकळ्या जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. चैत्र पाडव्यापासून ५० हून अधिक कामगार हा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पडावा म्हणून राबत आहेत. अन्नछत्रासाठी लागणाऱ्या आरोग्य, जिल्हा प्रशासन, अन्न-औषध प्रशासन, पोलीस दल, आदी सरकारी विभागांच्या लागणाºया सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेस प्रकाश केसरकर, रोहित गायकवाड, मनीष पटेल, चिंतन शहा, चेतन परमार, संकेत पाटील आदी उपस्थित होते. यात्राकाळात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, आरोग्य विभाग, महावितरण, आपत्कालीन व्यवस्था पाहणाºया स्वयंसेवी संस्था, टू व्हीलर असोसिएशन व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अखंड चार दिवस झटत असतात. त्यांचे कार्य व्यवस्थित पार पडावे याकरिता त्यांना चहा, नाष्टा, जेवण, इत्यादींची सोय ट्रस्टमार्फत करण्यात आली आहे. --------जनावरांचीही सोय जोतिबा यात्रेसाठी जसे भाविक बस, चारचाकी, दुचाकी घेऊन येतात, त्याप्रमाणे आजही बैलगाड्या घेऊन येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असते. अन्नछत्रात येणाºया भाविकांच्या पोटाची सोय केली जाते त्याप्रमाणे बैलांचीही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही बाब ध्यानी घेऊन ट्रस्टतर्फे यात्रेकरूंच्या बैलांसाठी उत्तम प्रतीची शेंगदाण्यांची कपरी पेंड, भुस्सा मोफत दिला जातो. यंदा १२०० किलो पेंड व २००० किलो भुस्सा छोट्या पिशव्यांमधून पुरविला जाणार आहे. याचीही तयारी पूर्ण झाली आहे. --------रक्तदात्यांकरिता वातानुकूलित बसरक्तदानाचे महत्त्व सर्वांना कळावे व त्यासंबंधीची भीती कमी व्हावी, याकरिता २००४ पासून जोतिबा यात्रेत अन्नछत्राच्या चार दिवसांच्या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाही हे शिबिर आयोजित केले आहे. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची वातानुकूलित बसमध्ये रक्तदान करण्याची सोय केलेली आहे. गेल्या वर्षी ४६५ युनिट रक्त जमा झाले होते. यंदा ५०० युनिट जमा होणे अपेक्षित आहे. हे जमा झालेले रक्त शासकीय रुग्णालयास दिले जाते. ----------समाजकार्यातील नवे नेतृत्व गेली अठरा वर्षे सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे जोतिबा यात्रेत येणाºया लाखो भाविकांसाठी अन्नछत्राचे काम अखंड सुरू आहे. यात प्रामुख्याने सन्मती मिरजे व समवयस्क मंडळींची कार्यकारिणी सातत्याने राबत आहे. सुरुवातीच्या काळात पन्नाशीत आलेली ही मंडळी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांतील दोन सदस्यांचे निधन झाले आहे. ही सेवा अखंड पुढेही न थांबता सुरू राहावी, याकरिता कार्यकारी मंडळाने यंदा युवा पिढीतील शिलेदारांकडे नेतृत्व दिले आहे. यात रोहित गायकवाड, मनीष पटेल, चिंतन शहा, चेतन परमार, संकेत पाटील यांचा समावेश आहे. मसालेभात..केशरयुक्त शिराजोतिबा यात्रेकरूंसाठी १७ ते २० एप्रिल दरम्यानच्या कालावधीत रात्रंदिवस चहा, मठ्ठाही दिला जातो. जेवणात मसालेभात, केशरयुक्त शिरा, शेवग्याच्या शेंगांची आमटी, बटाट्याची भाजी, वांगी-बटाटा भाजी, लोणचे, कोशिंबीर असे मिष्टान्न पोटभर दिले जाते. जोडीला अॅक्वागार्डचे शुद्ध, थंड पाणीही दिले जाते.