-डॉ. शिल्पा हुजुरबाजारया भागात आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित क्रियेशी संबंधित अशा एका समस्येविषयी आपण माहिती घेणार आहोत, ते म्हणजे ‘अन्न गिळणे.’ साहजिक आहे की, वाचकांच्या मनात असा प्रश्न उद्भवू शकेल की याचा व स्पीच थेरपीचा काय संबंध? पण, बोलण्याचे व अन्नग्रहणासाठी लागणारे स्नायू एकच आहेत व बोलण्याचे कौशल्य हे दुय्यम व नंतर विकसित झालेले आहे. याविषयी आपण सुरुवातीच्या काही लेखांमध्ये उल्लेखलेले आहेच. तर या गिळण्याच्या समस्येविषयी आपण आपले ज्ञान वाढवूया.
गिळताना त्रास होणे, अन्न लवकर घशातून खाली न उतरणे, पातळ पदार्थ खाता येतात पण, घट्ट अन्न कितीही चावून खाल्ले तरी घशाखाली उतरत नाही, छातीत अथवा पाठीत अडकल्यासारखे वाटणे, घशात जळजळ होणे, खाल्लेले अन्न पुन्हा तोंडात येणे, ज्याला आपण गचळी आली असे म्हणतो तसे होणे, आवाज बसणे, जेवताना ठसका लागणे, सतत खोकला येणे, सतत छाती भरणे, वजन घटणे, अशी अनेक लक्षणे गिळण्याच्या समस्येबरोबर दिसून येतात. कोणामध्ये ही समस्या जास्त दिसून येते, ते आपण पाहूया..
छोटी मुलं, विशेष करून तान्ही बाळं आणि वयोवृद्ध लोक या दोन्ही गटांमध्ये ही समस्या दिसून येते. आज काल आयांची तक्रार असते की, मुलं खातच नाहीत, अन्न तासन्तास तोंडात धरून ठेवते, जरा जाडसर अन्न दिले तर उलटी करते, बाळ तीन वर्षांचे झाले तरीही दाताने चावून खात नाही, मिक्सरमधून वाटून मगच भरवावे लागते, जेवायला खूप वेळ लागतो, काहीवेळा जरा मोठ्या मुलांना जेवताना प्रत्येक घासागणिक पाणी लागते, अशी तक्रार पालक करतात.
बाळाचे वजन नीट वाढत नाही असे वाटले की, दूध व त्यातून पौष्टिक औषधे बाळाला सुरू करतात. मुलालाही अन्न गिळण्यापेक्षा दूध गिळणे सोपे वाटते. खूप वेळ जेवणाऱ्या मुलांची टिंगलही केली जाते; पण त्या छोट्या मुलाला आपल्याला नेमके काय होते आहे हे सांगता येत नाही आणि समजत पण नाही. पुढे कधीतरी काळाच्या ओघात ते मूल भरभर गिळायला शिकते. बºयाचदा जागरूक पालक बालरोगतज्ज्ञांकडे तक्रार करतात; पण जर मुलाचे वजन कमी होत नसेल अथवा त्याला थकवा नसेल तर काहीवेळा ही वर्तन समस्या आहे, मूल हट्टी आहे, लाडावले आहे, असे निदान केले जाऊ शकते. काही जागरूक बालरोगतज्ज्ञ मात्र स्पीच थेरपीस्टचा सल्ला घेण्यास सांगतात.
बºयाचदा खाण्याची समस्या व न बोलणे ही समस्या एकत्रित दिसून येते. माझ्या बघण्यात परवा एका पाच वर्षांच्या मुलाला फक्त सेरेलॅकसारख्या पेजेवर ठेवलेले पाहिले. जेव्हा पालकांना खोदून विचारले तेव्हा त्याला फक्त पेजच आवडते आणि आम्ही ती देतो, असे उत्तर मला मिळाले. यात पालकांना काही अयोग्य किंवा शंकास्पद वाटत नव्हते.काहीवेळा सेरेब्रल पाल्सी, दुभंगलेले टाळू, अशा विकारांतही अन्न गिळता न येणे ही समस्या दिसून येते. हे सर्व झाले लहान मुलांविषयी! हीच तक्रार ज्येष्ठ नागरिकांमध्येही दिसून येते.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये याची कारणे भिन्न असू शकतात. घशाचा अल्सर, बारीक झालेली अन्ननलिका (पॅरॅलेसिस) पक्षाघातानंतर तोंडाच्या चावण्याच्या व गिळण्याच्या स्नायंूवरील नियंत्रण जाणे, तोंडाचा, जिभेचा अथवा अन्ननलिकेचा कर्करोग ही प्रमुख कारणे आहेतच; पण या व्यतिरिक्त मेंदूच्या अनेक गंभीर आजारात गिळण्यास अडचण ही प्रमुख समस्या दिसून येते. जसे पार्किनसन्स् डिसीज, मायास्थेनिया ग्रॅव्हीज वगैरे. आपण कारणे व लक्षणे पाहिली. याची तपासणी व निदान कसे करतात पाहूया. वाचा व श्रवणदोषतज्ज्ञ विविध प्रकारचे अन्न गिळायला देऊन रुग्णाची स्थिती ठरवितात व त्यानुसार आहारतज्ज्ञ त्या रुग्णाचे जेवण कसे असावे, हे ठरवितात. काहीवेळा खूप गंभीर परिस्थितीत नाकाद्वारे ट्युबने अन्न जठरापर्यंत पोहोचविले जाते. बेरिअम मिल टेस्ट यात विशिष्ट पद्धतीने एक्स-रे काढून नेमका अडथळा कोणत्या ठिकाणी येतो ते पाहिले जाते. तसेच स्नायूंच्या हालचालींचे विद्युत नोंदीकरण करूनही समस्येची व्याप्ती ठरविता येते.
एकदा का कोणते स्नायू किती कमजोर आहेत हे तपासणी अंती ठरले की, वाचातज्ज्ञ त्या रुग्णास विविध व्यायाम देऊन स्नायूंचे कार्य पूर्ववत करण्यास मदत करतात. माझ्या आठवणीतील एक रुग्ण ज्यांचा खूप मोठा लोकसंग्रह होता व त्यांना जेवणाची खूप आवड होती. त्यांची मुलं त्यांना माझ्याकडे मार्गदर्शनासाठी घेऊन आली. पक्षाघाताने त्यांच्या बोलण्यावर व अन्नग्रहणावर खूप परिणाम झाला होता. त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली की, ही तोंडातली नळी मला नको, मला चावून चावून नीट जेवायचे आहे. मी सूचवलेले व्यायाम ते गृहस्थ खूप मन लावून करीत. अखेर तीन ते साडेतीन महिन्यांनंतर त्यांना व्यवस्थित जेवता आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली होती.
(लेखिका वाचा, भाषा व श्रवणतज्ज्ञ आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com