पूर्वी ज्यांच्याकडे सायकल असायची ते श्रीमंत गणले जायचे. कोल्हापुरात बाबुराव बळवंत परमाळे यांनी १९१८ साली लक्ष्मीपुरीत परमाळे सायकल कंपनी नावाची सायकल दुकान घातले. हे दुकान आजही त्यांचे वारस चालवत आहेत. कोल्हापुरात अशी अनेक दुकाने होती. ज्यामध्ये प्रभाकर सायकल कंपनी, वोरा सायकल कंपनी, शेतकरी संघ असे अनेक दुकानदार होते. त्यापैकी सध्या केवळ परमाळे, वोरा (दोशी), घाटगे पाटील ॲन्ड सन्स अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दुकाने शिल्लक आहेत. पूर्वी सायकलींच्या किमती अगदी रुपयात होत्या. १९४९ साली २२ इंची सायकल केवळ २० रुपयांना मिळत होती. वीस रुपये फार मोठी रक्कम होती. हॅर्क्युलस, हिरो, बीएसए अशा सायकल कंपन्या होत्या. १९९० च्या दशकात सायकल ५०० रुपयांना होती. वाढता वाढे दोन हजार, त्यानंतर पाच हजार व्हाया पाच लाखांपर्यंत आहे.
डबलसीट कारवाई
३५ ते ४० वर्षांपूर्वी सायकलींची संख्या जास्त होती. सायकलला मागे कॅरिअर असे. पती-पत्नी आणि मुले असे कुटुंबदेखील सायकलवरून प्रवास करीत होते. जर कोणी सायकलवरून डबलसीट दिसले तर पोलीस हटकत. दंडाची कारवाई करत. समज म्हणून सायकलच्या मागील चाकातील हवा सोडून त्याची पितळी पुगळी काढून घेतली जात होती. पुढील लाईटचा डायनॅमा नसेल किंवा घंटी नसेल तरीही कारवाई होत असे.
नोंदणी क्रमांक म्हणून म्युनिसिपालटी बिल्ला देत
दुचाकी खरेदी केल्यानंतर त्याची रितसर प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कडे नोंद करावी लागते. तशी पूर्वी सायकल खरेदी केल्यानंतर त्याची नोंद तत्कालीन नगरपालिकेत केली जायची. त्याचा बिल्ला व त्यावर क्रमांक मिळायचा व तोच सायकल चालविण्याचा परवाना होता.
सायकली भाड्याने मिळत होत्या
पूर्वी दुचाकी मोठ्या प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये सायकल भाड्याने मिळेल असा बोर्ड असलेली दुकाने होती. त्यात तासांवर भाडे आकारले जायचे. त्याकरिता ओळख महत्त्वाची मानली जायची. अगदी २५ पैसे तास ते अडीच रुपये भाडे होते. काळाबरोबर ही भाड्याने सायकली देणारी दुकानेही बंद झाली.
आधुनिक सायकली अशा
पूर्वी २२ व २४ इंची त्यातही पुरुषांच्या आणि स्त्रियांकरिता वेगवेगळ्या सायकली येत होत्या. त्यानंतर बीएसएची रेसर आली. त्याला तरुणाईने जवळ केले. त्यानंतर काळ बदलला. आता हायब्रीड बाई, रोड बाईक, एमटीबी (माऊंटन बाईक) असे आधुनिक प्रकार आले आहेत. अनुक्रमे खराब व डांबरी रस्त्यांवर या सायकली चालतात. तर रोड रेससाठी मिश्र धातूच्या या सायकली आहेत.
आता इलेक्ट्रिक सायकल बाजारात
पॅडल मारून गिअर बदलून सायकल चालविण्यासोबतच आता एकावेळी चार्ज केली की ३० कि.मी. अंतर धावणारी बॅटरीवरील सायकल बाजारात विक्रीसाठी आली होती. याकरिता ३२ व्होल्ट लिथीनियम बॅटरी कार्यरत आहे.या सायकलची किंमत २५ हजार आहे.
प्रतिक्रिया
कोल्हापूर जिल्ह्यात व्यायामाचे महत्त्व वाढल्याने सायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सायकल खरेदीचा टक्का वाढला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुमारे १ लाखांहून अधिक सायकली दिमतीला आहेत. शारीरिक तंदुरुस्ती सायकल चालविण्यामुळे चांगले राहते. त्यामुळे प्रत्येकाकडे सायकल असावी.
- अनुप परमाळे, सायकल विक्रेते व आर्यनमन
किमान १० ते २० किमी सायकलिंग चालविणे काळाची गरज
पाय, मांड्या यांना व्यायाम मिळण्यासाठी घाट असणाऱ्या रस्त्यांवर अधिक सायकलिंग आवश्यक आहे. अनेकजण गिअरची सायकल यासाठी घेतात; मात्र वजनदार सायकल यासाठी आवश्यक आहे. शर्यतींकरिता गिअरची सायकल उपयोगी आहे. व्यायामासाठी किमान १० ते २० कि.मी. अंतर सायकल चालविणे शरीरासाठी चांगले आहे. दैनंदिन कामासाठीही सायकलचा वापर वाढू लागला आहे.
-प्रतापसिंह घोरपडे,सायकलप्रेमी