कोल्हापूर : मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड यांच्यामुळे गणेशोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे इंग्लंडमधील अनिवासी भारतीय एकत्र आले आहेत.
इंग्लंडमध्ये कोव्हेंट्री येथे राहणाऱ्या आणि जगवॉर लँड रोव्हर कंपनीत डिझायनिंग इंजिनिअर असलेल्या शीतल चिमड यांनी तिथे गणेशोत्सव सार्वजनिक केला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन त्यांनी भारतीय संस्कृती जपलेली आहे.शीतल चिमड यांनी गणेशो्त्सवाच्या माध्यमातून तेथील दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांना एकत्र आणत हा पारंपारिक उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. चिमड हे मूळचे सांगली जिल्ह्यातील. सुरुवातीला ते पुण्यातील टाटा तसेच महिंद्रा कंपनीत त्यांनी नोकरी गेली. पण गेल्या पाच वर्षापासून ते इग्लंडमध्ये आहेत. पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात त्यांनी भारतात असतानाच पुढाकार घेतला होता.आता इंग्लंडमध्येही त्यांनी तयार केलेल्या या गणेश मूर्तींचे तेथे उत्साहाने स्वागत झाले. व्यवसाय म्हणून गणेश मूर्ती तयार न करता केवळ भारतीय उत्सव परदेशातही जोमाने साजरा करावा, या हेतूने त्यांनी या मूर्त्या तेथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांनी तेथील शाळांमध्येच या पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्ती तयार केल्या. त्यासाठी महिनाभर आधी त्यांनी तेथे कार्यशाळा घेउन या मूर्त्या कशा तयार करायच्या याची माहिती दिली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घेउन अशा मूर्त्या तयार केल्या. या कार्यशाळेत तयार झालेल्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची इंग्लंडमधील जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांच्या घरी प्रतिष्ठापना केली गेली.इंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, अशीच त्यांची नेहमी मनोकामना असते. त्यामुळे महिनाभर आधीच चिमड यांच्याकडे गणेश मूर्तींची मागणी असते. नोकरीव्यतिरिक्त असलेला वेळ चिमड या मूर्ती तयार करण्यासाठी देत असतात. चिमड हे वैयक्तिकरित्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा आग्रह धरत असतात. या कामात त्यांना घरच्यांचीही मदत मिळते. अनेक घरांमध्ये मूर्ती विकत न आणता घरीच तयार करुन त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आॅनलाईनच्या माध्यमातून या मूर्ती आकाराला येतात. सार्वजनिक उत्सव एकत्र येउन साजरा केला जातो. या दिवसांत विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. सर्वजण या काळात भारतीय पोशाख आणि खाद्यपदार्थांवर भर देतात. भारतीय खेळ, नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल असते. कोव्हेंट्री येथे ढोल-ताशा आणि लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशाचे स्वागत झाले. यावेळी बुध्दिची देवता म्हणून गणेशापुढे ग्रंथदिंडीही काढली जाते. गणपती बाप्पा मोयरा म्हणत महिलाही या मिरवणुकीत साड्या आणि भारतीय पोशाखात सहभागी होतात.गेल्या तीन ते चार वर्षात या कार्यक्रमात इंग्लंडमधील स्थानिक रहिशवाशांचे सहभागी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.