कोल्हापूर : कोरोनाच्या नावानं बो बो बोंबला रे म्हणत कोल्हापुरकरांनी रविवारी पर्यावरणपुरक होळी साजरी केली. होळीच्या आगीत कोरोनाचे विषाणू भस्मसात होवू दे अशी प्रार्थना करत होळी लहान करा, पोळी दान करा, रस्ते खराब होवून नयेत याची काळजी घ्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला.गतवर्षी होळी साजरी झाली आणि कोरोनाा संसर्ग सुरु झाला. आता गेल्या दहा दिवसांपासून पून्हा संसर्गा वाढू लागल्याने रविवारी कोल्हापुरकरांनी या कोरोनाच्या नावाने शंख करत होळी पेटवली. यानिमित्त घराघरात पुरणपोळीचा बेत होता. सायंकाळी प्रत्येक घरासमोर लहान आकारात होळी पेटवण्यात आली तर होळीत प्रतिकात्मक नैवेद्य ठेवून होळीची पोळी गरजूंना दान करण्यात आली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी होळीमुळे रस्ते खराब होवू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब खासबाग च्या वतीने रस्त्यापासून अडीच फूट उंचीवर अंतराळी होळी पेटवण्यात आली व पंचगंगा स्मशान दानपेटीत सातशे एक रुपयांचा निधी देण्यात आला. संदीप पोवार, संकेत जोशी, अभिजीत पोवार, सागर सामंगडकर, सौरभ पोवार, रामचंद्र जगताप यांनी संयोजन केले.इंडियन मार्शल आर्ट थांग -ता असोसिएशनच्यावतीने शनिवारी सायंकाळी प्रबोधन जनजागृती रॅली काढण्यात आली. महावीर गार्डन, कलेक्टर ऑफिस ते रंकाळा येथे युवक खेळाडूंनी " प्रदूषण करू नका पृथ्वीला कष्ट देऊ नका", "प्रदूषणाचा धोका अणुयुद्धापेक्षा मोठा"," प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा", "होळी लहान करा पोळी दान करा", "होळी लहान करा पर्यावरणाचे रक्षण करा", "होळी लहान करा शेनी दान करा ", "नको मोठी होळी आरोग्यास होईल हानी", "होळी लहान करा प्रदूषण टाळा" असे फलक घेवून ही रॅली काढण्यात आली.
संघटनेतर्फे अनिल शेंडगे, भुषण पाटील, अरुण, पाटील, सुहास पाटील, सिंकदर कांबळे यांनी पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केली. सतीश वडणगेकर सचिव ,ऋत्विका शिंदे, महादेव वडणगेकर, तसेच महावीर धुलधर यांनी संयोजन केले.संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित शेणीदान उपक्रमासाठी श्री महालक्ष्मी फेरीवाले संघटनेच्यावतीने शेणीदान करण्यात आल्या. यावेळी शारंगधर देशमुख, अविनाश उरसाल , किरण गवळी, मोहन तगारे, बजरंग फडतारे, राजू कालेकर, सच्चू दर्यानी यांच्यासह फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.श्रमिकच्यावतीने आंदोलनस्थळी होळीचांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या २८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. सगळे कोल्हापूरकर आपआपल्या घरी आनंदाने हा सण साजरा करत असताना या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाच्या ठिकाणी होळी पेटवली. शासन आणि प्रशासनाला जाग येवून त्यांनी आमच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.