कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने गणपती बाप्पांच्या सुंदर आरासासाठी शहरात आकर्षक रंगसंगती व डिझाइनमध्ये इको फ्रेंडली स्वरुपात बारीक कलाकुसर व नक्षीकाम असलेली मंदिरे, मखर, वेलवेटचे आसन अशा साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. या साहित्यांची किंमत पाचशे रुपयांपासून ते विद्युत रोषणाई असलेल्या फोल्डिंगच्या आसनांची किंमत तीन हजारांपर्यंत आहे.
पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पांची आरास अधिकाधिक सुंदर असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता विशिष्ट थीम घेऊन आरास केली जाते. या सगळ्यात मोठी मदत होते ती तयार मखर, मंदिरे आणि आसनांची. सध्या थर्माकोल व प्लॅस्टिकवर बंदी असल्याने त्याची जागा एमडीएफ प्लायवूड व पुठ्ठ्यांपासून या सजावटाची निर्मिती केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने यात नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जात असून सगळी आरास इको फ्रेंडली करण्यावर भर दिला जात आहे. पांढऱ्या रंगाच्या बोर्डच्या मागे वेगवेगळ्या रंगांची विद्युत राेषणाई असलेले आसन हे विशेष आकर्षण ठरत आहेत. याशिवाय डिजीटल प्रिंट असलेली मंदिरे, पानाफुलांचे नक्षीकाम असलेले आसन, वेलवेटचे आसन, लाकडी मंदिरे असे वेगवेगळे प्रकार यात आहेत.
----
मखर, आसनांना पसंती
टेबलवर आरास मांडताना मंदिर असले की खूप जागा लागते. नंतर गौराईच्या वेळी पुन्हा आरास मांडावी लागते. त्यामुळे आसन आणि मखरांना सर्वाधिक मागणी आहे. हे साहित्य फोल्ड करून ठेवता येत असल्याने पुढील दोन तीन वर्षे ते वापरता येते. विद्युत माळांचे आसन देताना त्यांचे व्यवस्थित सेटिंग करून दिले जाते. त्यामुळे हे आसनही दीर्घकाळ टिकते.
--
कागद आणि पुठ्ठ्यांपासून बनवलेल्या आसन आणि मखरांना ग्राहकांची चांगली पसंती आहे. यांचे दर १ हजारपासून १५०० रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असल्याने त्यांची खरेदीची मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
मयूर सुतार (कळंबा)
----
फोटो नं ०६०९२०२१-कोल-आले गणराय०१,०२,०३
अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त सोमवारी कोल्हापुरातील बाजारपेठेत आकर्षक इको फ्रेंडली मखर, मंदिरे व आसन हे सजावटीचे साहित्य मांडले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---