आर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन, पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:08 PM2019-09-19T16:08:01+5:302019-09-19T16:10:18+5:30
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सर्व क्षेत्रांतील गैर व्यवस्थापनामुळे देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गुन्हेगारीही वाढली आहे. महापुरानंतरही नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. या सर्व बाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी महमंदशरीफ शेख म्हणाले, ‘महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज असून, त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे.’ अॅड. सुरेश कुराडे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला आहे. शेतीवरही झाला आहे. युती सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात १४ हजार ६७0 शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
गुलाबराव घोरपडे म्हणाले, अजूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे नीट पंचनामे झाले नाहीत; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा विपरित परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
यावेळी सरलाताई पाटील, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, आर. के. देवणे, संजय पोवार, किरण मेथे, ए. डी. गजगेश्वर, शंकरराव पाटील, विक्रम जरग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.