संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील स्वच्छतागृहात लघुशंकेची सुविधा मोफत असतानाही पैसे घेतले जातात. याबाबत राज्य सरकारच्या संकेतस्थळावर केलेल्या तक्रारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी संबंधित सुलभ शौचालय चालकाला दंड आकारला आहे. असे असले तरीही त्याने हा आदेश धाब्यावर बसविला असून, अद्यापही त्याची कार्यवाही केलेली नाही.लाखो भाविक आणि पर्यटक कोल्हापुरात येत असतात. त्यामध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, शहरात स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नाही, त्यातही महिलांसाठी स्वच्छतागृहेही अतिशय अल्प आहेत. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. एस.टी.ने येणाऱ्या महिला प्रवासी साहजिकच कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरील ‘पे अँड यूज’ तत्त्वावरील स्वच्छतागृहांचा वापर करीत असतात. या सुलभ शौचालयांचा ठेका सध्या परप्रांतीयांकडे आहे. महामंडळाने ठरविलेल्या निकषांनुसार ही सेवा उपलब्ध करून देण्याचे बंधन असले तरी कोल्हापुरातील सुलभ शौचालय चालकाने मात्र हे निकष धाब्यावर बसविले आहेत.कोल्हापूर बसस्थानकावरील सुलभ शौचालयाच्या वापरासाठी पाच रुपये आकारले जाते. मात्र, लघुशंकेसाठी शौचालयाचा वापर मोफत असताना संबंधित चालक स्त्रियांकडून पाच रुपये घेतात. याबाबत अनेक महिला आणि त्यांच्या नातेवाइकांनी स्थानकप्रमुखांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे आतापर्यंत कानाडोळा केला जात होता. अवधूत भोसले या जागरूक नागरिकाने दि. ८ एप्रिलला याबाबत ‘आपले सरकार’ या राज्य सरकारच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविली. त्याची दखल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली. शहानिशा केल्यानंतर कोल्हापूर आगाराच्या विभाग नियंत्रकांना दि. २० एप्रिलला लेखी पत्र पाठवून कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे.महानगरपालिकेने केली शहानिशामहानगरपालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांनी या शौचालयाची समक्ष पाहणी केली. यासाठी पालिकेच्या कर्मचारी कल्पना माने यांना शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाठविले असता त्यांनाही लघुशंकेसाठी पाच रुपये आकारण्यात येत असल्याचे आढळून आले. वास्तविक, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. याशिवाय या ठेकेदाराने याठिकाणी शुल्कासंदर्भातील कोणताही फलक लावलेला नाही. या शौचालयाच्या महिला विभागातही अस्वच्छता आढळली आहे. तेथे वापरण्यात आलेले सॅनिटरी नॅपकिन्स जागोजागी टाकलेले आढळून आले.कोल्हापूर आगारालादिली लेखी सूचनाहे शौचालय एस.टी.च्या अखत्यारित येत असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्याधिकाºयांनी दि. २० एप्रिलला विभाग नियंत्रकांना लेखी पत्र पाठविले. तसेच दि.२१ एप्रिलला ‘आपले सरकार’ या राज्य सरकारच्या पोर्टलवर त्याची माहिती प्रसारित केली.शौचालय चालकाची फलक लावण्यास टाळाटाळशौचालय वापराच्या शुल्क आकारणीबाबत दर्शनी भागात फलक लावण्याविषयी तसेच स्वच्छता राखण्याविषयीचे आदेश एस. टी.च्या विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. मात्र, अद्यापही या ठेकेदाराचा उर्मटपणा कायम असून, त्याने कोणताही फलक लावलेला नाही, तसेच अस्वच्छता कायम आहे.
‘सीबीएस’ स्वच्छतागृहात आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:10 AM