घन:शाम कुंभार- यड्राव -प्रवासासाठी एस.टी., रेल्वेपेक्षा खासगी प्रवासास सध्या प्राधान्य मिळत आहे. याचा गैरफायदा घेत मनमानी प्रवास भाडे, प्रवास रद्दचे पैसे परत देण्यास नकार, पुरेशा सुविधा उपलब्ध नसणे, आदींमुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे, तर बोटांवर मोजणारे प्रवासी ग्राहक न्यायालयात गेल्याने त्यांना नुकसानभरपाई व प्रवासी कंपन्यांना दंड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रवासी व ट्रॅव्हल्स कंपनी यांच्यात योग्य समन्वय झाल्यास उद्योगवाढीस पूरक ठरणार आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.इचलकरंजी परिसरात चार-पाच ट्रॅव्हल्स एजन्सी कार्यरत आहेत. त्यापैकी एका एजन्सीमधून पुणे येथे जाण्यासाठी एका महिलेने पैसे भरून तिकीट काढले होते; परंतु मुलगा अचानक आजारी पडल्याने बस सुटण्याच्या आधी सुमारे तीन तास प्रवास रद्द करण्याची विनंती एजन्सीकडे केली. त्यावेळी कंपनीकडून बदली प्रवासी मिळाले, तर तिकीट रद्द केले जाईल, असे सांगितले व तिकीट रद्द करण्यास नकार दिला. पुन्हा एजन्सीबरोबर संपर्क साधला असता बसमधील सीट रिकामी गेली. बदली प्रवासी मिळाले नसल्याने प्रवासाचे पैसे परत देण्यास नकार दिला.इचलकरंजी येथून शिर्डी, नगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह पंधरा ते वीस प्रमुख शहरांमध्ये सहा प्रवासी बसेसची वाहतूक होते; परंतु संबंधित एजन्सीच्या कार्यालयात कोणत्या शहरासाठी किती प्रवास भाडे याचा तक्ता लावला नाही. तेथील व्यक्ती सांगेल ते भाडे असते. प्रवासाची गरज असल्याने हा नाहक प्रकार प्रवाशांना सहन करावा लागतो.आराम बसमध्ये कोणतीही सीट रिकामी ठेवून बसचालक वाहतूक करत नाहीत, तर चालक केबीनमध्येही प्रवासी घेऊन बेकायदा वाहतूक होते. अशा परिस्थितीत संबंधित कंपनी इचलकरंजी ते पुणे या प्रवासात मोकळ्या सीटवर प्रवासी न घेता जाईल कशी? त्यामुळे प्रवास करणाऱ्यांचेही भाडे व प्रवास रद्द करणाऱ्यांचेही भाडे कंपनीस मिळते. ही एक प्रकारची लूटच आहे. बऱ्याच प्रवाशांना अशा प्रकारचा नाहक त्रास होतो; परंतु सजग प्रवासी ग्राहक न्यायालयाचे दार ठोठावतात. त्यामुळे प्रवाशांना सोयी-सुविधा न पुरविलेल्या प्रवासी कंपन्यांना दंड होऊन प्रवाशांना नुकसानभरपाई मिळाल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. प्रवाशांनी कोणत्या कारणास्तव व कोणत्या परिस्थितीत प्रवास रद्द केला, हे सहानुभूतीपूर्वक पाहणे, तसेच योग्य प्रवास भाडे (सतत न बदलता) घेतल्यास प्रवाशांना सोयीचे व ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या उद्योगवाढीस पूरक ठरेल.
ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट
By admin | Published: November 19, 2014 9:35 PM